आम्हाला मेट्रो नको आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग पाहिजे ; पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

टीम महाराष्ट्र देशा: “शेतात तोटा झाला तरी बँकेचे व्यवहार नीट ठेवल्याने मी कर्ज मुक्तीमध्ये बसलो नाही. व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय हेच कळत नाही” ही करून कहाणी आहे शिममधील मानोरा तालुक्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर नारायण मिसाळ यांची. त्यांनी आपली ही कहाणी 27 नोव्हेंबरला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन सांगितली देखील आणि आत्महत्येचा इशारा सुद्धा दिला. पण गेंड्याचे कातडे पांघरलेल्या सरकारला याची काही चिंता वाटली नाही आणि अखेर मंत्र्यांना आपली करुण कहाणी सांगूनही प्रश्न न सुटल्यानं ज्ञानेश्वर मिसाळ या 55 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.

ज्ञानेश्वर मिसाळ यांच्यावर आयसीआयसी बँकेचं 3 लाखांचं, महिंद्रा फायनान्सचं अडीच लाखांचं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं दीड लाखांचं कर्ज होतं. हे कर्ज फेडता न आल्यानं ज्ञानेश्वर नारायण मिसाळ यांनी 6 डिसेंबर रोजी यवतमाळला जाऊन तिथं विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली.

ज्ञानेश्वर मिसाळ यांनी आत्महत्या पूर्वी लिहिलेलं पत्र

विदर्भात जर कारखाने असते, तर गावातील 200 ते 250 कास्तकरांना पुणे-मुंबई पोट भरण्यासाठी जायची वेळ आली नसती. विदर्भ वेगळा झाला असता तर ही वेळ आली नसती. खरोखर आम्हाला मेट्रो नको आहे, आम्हाला जगण्याचा मार्ग पाहिजे. शेतात तोटा झाला तरी बँकेचे व्यवहार नीट ठेवल्याने मी कर्ज मुक्तीमध्ये बसलो नाही. व्यवहार चांगले ठेवणे म्हणजे गुन्हा केला काय हेच कळत नाही.