राज्यातील १९ लाख शेतकरी झाले उन्नत व समृद्ध…

कृषी विभागातर्फे राबविलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान’ या पंधरवड्यात राज्यभरात ३६ हजार मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये सुमारे १९ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. येणाऱ्या काळात विभागातर्फे १२ हजार शेती शाळांचे आयोजन करून त्या माध्यमातून सुमारे ३ लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्यभरात दि. २५ मे ते ८ जून या काळात आयोजित केलेल्या या कार्यक्रमांत शेतकऱ्यांना योजना व तंत्रज्ञान यांची माहिती देण्यात आली. जमीन आरोग्यपत्रिका, बियाणे-खते खरेदी करताना घ्यायची काळजी, बीज प्रक्रिया, भाऊसाहेब फुंडकर व रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना, ठिबक व तुषार सिंचन इत्यादी अनेक योजनांबद्दल कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

शेतीशाळांमध्ये भात, कापूस, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, ऊस व हरभरा या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतीशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती त्याद्वारे शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे, असे विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.