‘या’ जिल्ह्यात खरिपाचे १०५ टक्के कर्जवाटप

पीककर्ज

सातारा – जिल्ह्यात खरीप हंगामात सर्व बँकांनी मिळून दोन लाख ५८ हजार ५१९ शेतकरी सभासदांना १६७९ कोटी रुपयांचे म्हणजेच उद्दिष्टांच्या १०५ टक्के कर्ज वितरण केले गेले आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांचा आधार ठरत असून या बँकेने सर्वाधिक १३६ टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज वितरण सुधारणा केली असून या बँकांनी उद्दिष्टांच्या ६४ कर्ज वितरण केले आहे.

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी संकटात सापडला असे दिसून आले आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॅाकडाऊन पिकांचे झालेले नुकसान तसेत काढणीच्या वेळी दुष्काळी पट्ट्यात झालेली अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी १६०० कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. सप्टेंबर अखेर सर्व बॅंकांनी मिळून दोन लाख ५८ हजार ५१९ सभासदांना १६७९ कोटी म्हणजेच उद्दिष्टाच्या १०५ टक्के वाटप करण्यात आले.

जिल्हा बँकेने कर्ज वितरणात हात सैल ठेवत शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले आहे. जिल्हा बॅंकेने ९५० कोटींचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. या बँकेने दोन लाख ३१ हजार ५१४ शेतकऱ्यांना १२९५ कोटी रुपयांचे म्हणजे १३६ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्ज वितरणाची टक्केवारी जास्त दिसत असली तरी तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज वितरण कमी झाले आहे.

जिल्ह्यात कार्यरत २० राष्ट्रीयीकृत बॅंकांना ४९० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी बॅंकांनी ३१४ कोटी सहा लाख रुपयांचे म्हणजेच अवघे ६४ टक्केच पीक कर्जवाटप झाले होते. खासगी बँकांकडून कर्ज वितरण काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. या बँकांना १५८ कोटी ८० लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ६९ कोटी २१ लाख रुपयांचे म्हणजेच उद्दिष्टांच्या ४४ टक्के कर्ज वितरण केले आहे.

राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांकडून सुधारणेची गरज

जिल्ह्यात कर्ज वितरणाचे उद्दिष्ट जरी साध्य झाले असलेतरी राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून कर्ज वितरणात सुधारणा करणे गरजेचे आहे. काही राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांकडून कर्ज वितरण लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. या बँकांनी किमान ९० टक्के कर्ज वितरण आवश्यक आहे. या हंगामात ५० टक्केच्या आत कर्ज वितरण करण्याऱ्या बँकांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –