राज्यातील पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून १३३ कोटींचा निधी मंजूर

पूरग्रस्ता

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जलमय होऊन मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याला १३३ कोटी ८९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम येत्या २० सप्टेंबरपासून देण्यात येणार आहे. यापूर्वी २९ हजार ५६८ कुटुंबांना दहा हजारांप्रमाणे २९.५० कोटींचे सानुग्रह अनुदान वितरीत केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यासह अनेकांनी आंदोलन केले होते.

महापुराचा सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यांतील ११३ गावांना तडाखा बसला. कृष्णा, वारणा काठावरील गावे पाण्याखाली गेली. सांगलीसह चार तालुक्यांतील कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. नदीकाठावरील ९७ हजार ४८६ शेतकऱ्यांची ४० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली होती. पूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले होते. महापुराचे पाणी आलेले आणि पाण्यामुळे स्थलांतरित झालेल्या ७३ हजार ९६७ कुटंबांचे पंचनामे झाले. ५२३ घरे पूर्णत: नष्ट झालेली आहेत. या सर्वांना येत्या सोमवारपासून मदत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्या प्रलंबित असलेल्या मदतीबाबत राज्य शासनाने शुक्रवारी सायंकाळी उशिराने याबाबतचे आदेश काढले आहेत. पूरग्रस्तांसाठी ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तरतुदीनुसार देय असलेली १५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपये इतका निधी आणि राज्य शासनाने दिलेली ११८ कोटी २६ लाख ३७ हजार रुपये इतकी वाढीव निधी, असा एकूण जिल्ह्याच्या वाट्याला १३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकारी यांना वितरित होईल.

महत्वाच्या बातम्या –