तूर खरेदीसाठी राज्यभरात 159 केंद्रे; योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सुभाष देशमुख

मुंबई, ३१ जानेवारी  : राज्यात सन 2017-18 या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी करण्यात येणार असून आधारभूत दराने तूर खरेदीला उद्या, 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. राज्यात 159 खरेदी केंद्रे उघडण्यात आली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.

राज्यात 2017-18 या हंगामात नाफेडमार्फत तूर खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी शेतकरी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी NELM पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर अथवा बाजार समिती आवारात जावे लागू नये, यासाठी मंडळस्तरावर अथवा मोठ्या गावामध्ये तुरीची नोंदणी करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.

नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांनी आधारकार्डची छायाकिंत प्रत, सुरू असलेल्या बँक खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेकबुक), सात बारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरेदीचे चुकारे बँक खात्यात ऑनलाईन होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी.

राज्यात कुठे आणि किती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत ?

राज्यात नागपूर (9), वर्धा (7), अमरावती (9), अकोला (5), वाशिम (4), यवतमाळ (11), बुलढाणा (11), नांदेड (8), परभणी (6), हिंगोली (5), औरंगाबाद (4), बीड (12), जालना (9),लातूर (9), उस्मानाबाद (9), अहमदनगर (9), धुळे (2), नंदूरबार (8), सांगली (1), सातारा (1), पुणे (1), चंद्रपूर (4), जळगाव (9), नाशिक (4) आदी जिल्ह्यात एकूण 159 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तूर खरेदीसाठी उपलब्ध खरेदी केंद्रांशिवाय ही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.