सोलापूर जिल्हयातील ३५ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित – आमदार हेमंत टकले

नागपूर दि.१० जुलै – सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीमध्ये त्रुटी असल्यामुळे ३५ हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले असल्याची बाब आमदार हेमंत टकले यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सभागृहासमोर उघडकीस आणली.

राज्यशासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजना सुरु केली.त्या योजनेतंर्गत जिल्हानिहाय शेतकऱ्यांची संख्या व त्यांना वाटप केलेल्या कर्जाच्या रकमेबाबतची माहिती शासनाने संकेत स्थळावर दिली आहे हे खरे आहे का? आणि या कर्जमाफीसाठी ग्रीन, यलो, आणि व्हाईट यादी शासनाने जाहीर केली आहे का? असे प्रश्न सरकारला करतानाच योजना लागू होवूनही आतापर्यंत १ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या आहेत असा सवाल आमदार हेमंत टकले यांनी सरकारला केला.

कर्जमाफीतील जाचक अटीमुळे व सदोष कार्यपध्दतीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. तर राष्ट्रीयकृत बॅंकाकडील ग्रीनलिस्टमध्ये उणिवा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी होवूनही नवीन पीककर्ज मिळालेले नाही. याबाबतची माहिती सरकारने द्यावी आणि कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी दुर करुन उर्वरीत शेतकऱ्यांना लाभ कधी देणार असा जाब आमदार हेमंत टकले यांनी सरकारला विचारला.

या प्रश्नोत्तरामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सहभाग घेत राज्यातील ३७ लाख ७८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तर उर्वरीत शेतकऱ्यांची कर्जमाफी का अडकली आहे. ऑनलाईनमध्य़े ही कर्जमाफी अडकली आहे का? असा सवाल केला.

दरम्यान कर्जमाफीसाठी पात्र असतानाही ऑनलाईनमध्ये कर्जमाफीचा अर्ज केलेला असताना कर्जमाफी मिळाली नाही अशा कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी राज्यसरकार टेलिफोन नंबर देणार का ? अशी विचारणा धनंजय मुंडे यांनी सरकारकडे केली. त्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अशा तक्रारी नोंदवून घेण्यासाठी टोल फ्री नंबर सुरु करणार असल्याची घोषणा केली.

बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले ३७ हजार ५०० रूपये कधी देणार ते सांगा ?- मुंडे