जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात आतापर्यंत ३७७ कोटींचे वाटप!

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी १ हजार २९२ कोटी ९६ लाख ४२ हजार रुपये पीक कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २२५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेड यांनी दिली.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. हा हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षात खरीप हंगामाचे पिकाखाली सरासरी क्षेत्र सहा लाख ७५ हजार हेक्‍टर असून यंदा सहा लाख ८१ हजार हेक्‍टरवर पेरणी करणे अपेक्षित आहे. प्रामुख्याने नगदी पीक म्हणून कपाशी व मका पीक घेतले जाते. तर बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे. यासाठी दोन लाख ५५ हजार ८१० मेट्रिक टन खताचे आवटन मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात दोन लाख तीन हजार हेक्‍टरवर खरिपाचा पेरा झाला आहे.

सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्के आहे. काही दिवस पाऊस गायब झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग येईल असे दिसून येत आहे. पिक कर्ज वेळेत मिळावे यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा वेळेत करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेला खरीप हंगामासाठी ४१९ कोटी ७२ लाख ३९ हजार रुपयांचे उद्दिष्ट, राष्ट्रीय व खासगी बँकेला ७१४ कोटी ७८ लाख ४६ हजार तर ग्रामीण बँकेला १९८ कोटी ४५ लाख ५७ हजार रुपये असे एकूण एक हजार २९२ कोटी ९६ लाख ४२ हजार रुपयांचै पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –