उजनी धरणातील ६५ टीएमसी पाणी गेले वाहून

सोलापूर- परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या उजनी धरणातून जादा झालेले ६५ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. ते पाणी पुढे कर्नाटकात गेले. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये यातील ६० टक्के पाणी वाहून गेलेे.

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येतात, मात्र यंदा ऑक्टोबर संपत आला तरी धरणा परिसरातून विसर्ग सुरू असल्याने धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात सरासरी १०७ टक्के पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे ऑगस्टमध्येच ओव्हरफ्लो झाल्याने विसर्गामध्ये मोठी वाढ झाली.

यामुळे धरणातून सप्टेंबरपासूनच भीमा नदीत विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला जादा पाण्याने जिल्ह्यातील पाझर तलाव, मध्यम प्रकल्प भरून घेण्यात आले. शिवाय पावणेदोन टीएमसी पाणी भीमा-सीना जोडकालव्याद्वारे सोडण्यात आले.जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत धरणातून ८५ टीएमसी पाणी सोडले. यात अतिरिक्त ६५ टीएमसीसह सोलापूरला पिण्यासाठी ३.५५ टीएमसी, खरीप हंगामासाठी ७.७५ टीएमसी, कालव्याशेजारील पाझर तलाव, मध्यम प्रकल्प भरून घेण्यासाठी ७.३१ टीमएसी, जोडकालव्यातून १.६७ टीएमसी पाण्याचा समावेश आहे.

अजूनही धरण परिसरातून पाणी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे.पुणे जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार झाल्याने उजनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले. धरण १०० टक्के भरले असल्याने अतिरिक्त ठरलेले पाणी नदीपात्रातून सोडण्यात आले आहे. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात धरणातून नदीच्या पात्रात ६५ टीएमसी पाणी सोडण्यात आले, असे अभियंता शिवाजी चौगुले यांनी सांगितले.