‘या’ जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून सक्रीय रुग्णांमध्ये मोठी घट

कोरोना

औरंगाबाद – शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाधित रुग्णांची संख्या देखील वाढतच आहे. मात्र मागील आठ दिवसापासून सक्रीय रुग्णांमध्ये कमालीची घट होत चालली आहे. या दिवसांत दिड हजाराने रुग्ण कमी झाले असून सद्यस्थितीत शहरात ७ हजार सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्यापासून औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. घराघरात बाधित रुग्ण आढळून येत आहे. मार्च महिन्यात तर रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. या एका महिन्यातच ३२ हजार बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ३३ टक्क्यांवर गेला होता. मात्र प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली.

त्यामुळे रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमधील रुग्णांचा ताण कमी झाला. त्यासोबतच अंशत: लॉकडाऊन लागू केला. शनिवार, रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाऊन, गर्दीवर निर्बंध लावण्यात आले. नागरिकांना नियम पाळण्याची सक्ती केली. त्याचा परिणाम रुग्ण संख्या कमी होण्यावर झाला आहे. रुग्णसंख्या कमी झाली असून गंभीर रुग्णांवर देखील नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे संसर्गातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास मदत झाली. त्यामुळे दिवसेंदिवस झपाटयाने रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. आज रोजी शहरात कोरोनाचे ७ हजार १८ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यामध्ये घाटी रुग्णालय ३७० जिल्हा रुग्णालय १८८, खासगी रुग्णालय २९२०, मेल्ट्रॉन कोविड सेंटर ३३२, कोविड सेंटर १५३१, होम आयसोलेशन १६७७ या रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –