धर्मा पाटील प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना खुले पत्र

पुणे – सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर काल विरोधकांनी टीका करत सरकारवर चांगलीच आगपाखड केली. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली होती ,या टीकेनंतर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राम सातपुते या विद्यार्थी नेत्याने लिहलेलं पत्र सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहे. यात सुप्रिया सुळे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

DHARMA PATIL

काय आहे प्रकरण ?
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.

सुप्रिया सुळे याचं ट्विट

 सुप्रिया सुळेंना लिहलेलं खुले पत्र

काल सुप्रिया ताई म्हटल्या
धर्मा पाटील यांच्या दुर्देवी आत्महत्या नंतर मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे . सुप्रिया ताई ना माझे खुले पत्र…..!

आदरणीय सुप्रियाताई
सप्रेम नमस्कार ..

पत्र लिहण्यास कारण की, आज काल आपलं शेतकरी प्रेम पाहून माझं मन कळवळले म्हनून चार शब्दाचे आपुलकीचं हितगुज आपल्या सोबत बोलावं म्हणून हे पत्र लिहितोय…

तसं पवार कुटुंबियाचं शेतकरी प्रेम तर अवघा महाराष्ट्र जाणतोच. केवळ जाणतोच तर अनूभवतोय सुद्धा. याचे अनेक दाखले तुम्हाला देउ शकतो.

महाराष्ट्रात लाखो – करोडो रूपये शेतकरी हितार्थ आपले पिताश्री मुख्यमंत्री झाल्यापासुन ख़र्च केले आणि महाराष्ट्र गेली अनेक वर्षापासुन सुजलाम सुफलाम केला याची प्रचीती महाराष्ट्र रोज अनुभवतोय. हजारो कोटी रुपयाची धरणं आपले बंधू अजित दादांनी महाराष्ट्रात बांधली हे महाराष्ट्र चांगल्या प्रकारे जाणतो. हेही आपणास ठाऊक आहेच. मागच्या काळात आपण सत्तेत असताना मावळच्या शेतकरी मायबापांनी आंदोलन केलं तेव्हा आपल्याच सत्तेतील लोक़ांनी (आपणच) त्याना गोळ्या घातल्या हे आपले आणि आपल्या कौटुंबिक पक्षाचं शेतकरी प्रेम महाराष्ट्र कदापि विसरनार नाही. आणि इतकी मेहरबानी विसरेलही कसा ? तसं तर ताई, मी स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्यानं आपल्या पक्षातल्या गावागावातल्या नेत्यांचं पराक्रम जवळून बघितले. शेतकरी बाप होरपळताना बघितला. लवासाचा हिरवाकंच तुकडा मिणमिणत्या झोपडीतून बघण्याचं भाग्य आपणच दिलं. आपण सत्तेत असताना बांधलेल्या धरणात आज चिक्कार पाणी आहे. गोरगरिबांना सोयीसाठी तुम्ही बांधलेली धरण शोधायला विदेशी कंपनीचे करोडो रूपयाचे नव्याने टेंडर काढावं लागेल इतकी प्रगती आहे.

एखाद्या गावात जर एखादा प्रकल्प उभारणार असेल तर त्या गावातली काही जमीन आपल्या पक्षाच्याच लोकांनी कवडीमोल दराने खरेदी करून तिथं बापजाद्याच्या जागेत प्रकल्प उभा करायचे ही बडी खेळी महाराष्ट्र चांगली ओळख़तो. ताई, आपण महाराष्ट्राच्या आवडत्या महिला नेतृत्व आहात. आपण अशा विषयावरही बोललं तर बरं वाटेल. पण कसं बोलणार तेही आहेच म्हणा. ताई, एक लहान भावाच्या नात्याने आपणास विचारतो, “कधी तरी पवना धरण पाणी वाटप विरोधात आंदोलनातील शेतकऱ्यांना भेटा. ज्याना आपलं सरकार असताना लोकशाहीतून आंदोलन करताना गोळ्या घालून ठार मारलं. ताई, आपल्या सरकारच्या काळात शेतकरी योजना बाबतीत अनेक भ्रष्टाचार झाले. दादांचा सिंचन घोटाळा असेल नाहीतर रमेश कदमांचा महामंडळाचा घोटाळा असो. कधी तुम्ही काहीच बोलले नाहीत.

ताई, डोंगरात शहर वसवायचं म्हनून कवडीमोल भावात आमच्या शेतकऱ्यांकडून जमीनी बळकावल्या. तुम्हीं लवासा बांधलं, सांगा ना, उन्हातान्हात राबणारा आमचा बाप जेव्हा तुमच्या धोरणाखाली झुकला आणि जमिनी दिल्या तेव्हा कुठे गेलं तुमचं शेतकरी प्रेम?

ऐन संक्रातीच्या दिवशी बीडच्या आष्टीतल्या क़ुंटेफळ या गावात साठवण तलावाच्या भूमिअधिग्रहनाच्या नावाख़ाली महिला सुवासिनींना लहान थोरासहित पोलिसांकडून जनावरासारखं झोडपून काढलं. ताई, याबद्दल या घटनेविरोधात आपल्या सरकारच्या विरोधात आपले सात दिवसाचे आमरण उपोषण महाराष्ट्र कसा विसरेल बर ?

ताई आपल्या काळात कर्जमाफ़ी झाली. शेतकऱ्यांची कधी झाली कर्जमाफी ? ज्याचा चुकीच्या पद्धतीने आपल्या पक्षातील अनेक नेत्यानी बँका लुटून खाल्ल्या याच्या विरोधात तर आपण पक्ष सोड़नार होता परंतु थोडक्यात राहिला. तूमचा हा अविरत संघर्ष महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. आपल्या सरकारच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याविरोधात आपण केलेला अन्नत्याग महाराष्ट्राची माती विसरूच शकत नाही.

ताई, गावागावात प्रत्येक सरकारी योजना माझ्याच घरात आली पाहिजे ही राष्ट्रवादीच्या लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आपले अथक परिश्रम व्यर्थ गेले हे एक शेतकरी पुत्र म्हणून खूप जवळून पाहिले आणी अनुभवले सुद्धा आहे. ग्रामपंचायत, पंचायत समितीपासुन राज्य शासनापर्यंत योजना खाणारी मोठी टोळी आपल्या पक्षात सक्रीय झाली होती. हे आपणास माहित झाल्यानंतर आपण वेळोवेळी केलेल्या कारवाईने त्या काळी महाराष्ट्रातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता. काल परवा तेव्हाचे वृत्तपत्र वाचताना आपल्याबद्दल अभिमान वाटला.

ताई, काल धर्मा पाटील नावाच्या ८४ वयाच्या पितृतुल्य शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येला आपला पक्षच जबाबदार आहे हे माहित नसेल तर सांगतो मी. आपल्या कुणीतरी नेत्याने त्यावेळी केलेला प्रताप बघा जमलं तर…… तिथला एखादा सातबारा आपल्या पक्षातील कुणाच्या नावावर नाही ना खात्री करा. हल्लाबोलताय याचा आनंद आहे. पण काखेत कळसा अन गावाला वळसा होऊ नये याची मला सतत चिंता वाटतीय ओ…

ताई, घरातील सर्वाना नमस्कार सांगावा….

आपला ,
धाकटा भाऊ
राम सातपूते