गावांचे पाणी नमुने तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत धोरण तयार करावे -आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे

गावांमधील पाणी नमुने तपासणी आरोग्य विभागामार्फत केली जाते, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरीता धोरण तयार करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विभागाला दिले. पुणे येथे नुकताच विभागाचा सविस्तर आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभागामार्फत शालेय आरोग्य तपासणी केली जाते. या शाळांमध्ये शासकीय अनुदान न मिळणाऱ्या शाळांचा समावेश करण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य विभागांतर्गत असणाऱ्या सर्व रुग्णवाहिका व इतर वाहनांबाबत अद्ययावत माहिती मिळण्याकरिता सॉफ्टवेअर तयार करण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यात क्षयरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता तपासणी केंद्रांची संख्या दुपटीने वाढवावी. त्याबरोबर याबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जाणीवजागृती करावी, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग क्षयरोग निर्मुलन मोहिमेमध्ये वाढवावा, असे आवाहन श्री.टोपे यांनी यावेळी केले.

आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची बाह्ययंत्रणेद्वारे तपासणी करुन योजनांचा दर्जा वाढविण्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत त्वरित कार्यवाही करावी. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केल्या.

महत्वाच्या  बातम्या –

आरोग्य केंद्रांतील भरती प्रक्रियेला गती देण्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांचा प्रतिबंध करावा – एकनाथ शिंदे

राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, चंद्रकांतदादांचे विठ्ठलाला साकडे

राज्यातील प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे