पारनेर तालुक्यात तुफान आलया; हजारो जलमित्रांनी केले महाश्रमदान

पारनेर/प्रशांत झावरे पाटील : राज्यातील सर्वात दुष्काळी तालुका अशी ओळख असलेला तालुका म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका, पण गेल्या काही वर्षांपासून या तालुक्याने हा शिक्का पुसून टाकण्यासाठी कंबर कसली असून येणाऱ्या प्रत्येक संधीचा पारनेरकर पुरेपूर उपयोग करत आहेत. जलयुक्त शिवार या महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या कामांमधून बऱ्याच गावांनी पाणलोट क्षेत्र विकासाची अनेक कामे करून घेतली व आपापली गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व आदर्श करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, या प्रयत्नांना बऱ्याच प्रमाणात यश मिळाले. पण नवनवीन संधींचा योग्य रीतीने वापर करून आपल्या गावाला आदर्श बनविण्यासाठी व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पारनेर मधील प्रत्येक गावाची धडपड वाखाणण्याजोगी असते. त्यातीलच एक संधी म्हणजे पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा होय. गेल्या २३ दिवसांपासून चालू झालेल्या पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पारनेर तालुक्यातील ३९ गावांनी सहभाग घेतला आहे आणि पाणलोट उपचारांचे यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन कामेही मोठ्या जोमात व उत्साहात चालू आहेत. यांत्रिकीकरणाबरोबरच, गावागावात श्रमदानाची मोठी चळवळ यानिमित्ताने उभी राहिली आहे. गावागावातील वाद या यानिमित्ताने संपून गावे एकजुटीने कामे करत आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच गावांनी १ मे या दिवशी महाराष्ट्र दिनी आयोजित महाश्रमदानात उत्साहात सहभाग नोंदवला. गावागावांतील ग्रामस्थांबरोबर मुंबई, पुणे व अन्य ठिकाणाहून आलेल्या नोकरदार वर्गानी व अन्य ठिकाणांहून आलेल्या जलमित्रांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवून पानी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना प्रोत्साहन दिले. पारनेर तालुक्यातील गटेवाडी, म्हसने, नांदूर पठार, कोहोकडी, पिंपळगाव रोठा, बाभूळवाडे, पुणेवाडी, गारगुंडी, पानोली, जातेगाव यांसह अनेक गावांमध्ये महाश्रमदान अतिशय उत्साहात पार पाडून पाणलोटाची अनेक कामे झाली.

गावगावांमधील एकजुटीचे दर्शन यानिमित्ताने पाहायला मिळाले. एरवी राजकारणात एकमेकांविरुद्ध उभे असणारे गावातील दोन गट या महाश्रमदानात एकदिलाने गावच्या पाण्यासाठी हातात हात घालून एकत्र काम करत होते. करोडो लिटर पाणी अडेल व जिरेल अशी अनेक कामे या गावांनी काही तासात यशस्वीपणे पूर्ण केली. समाजासमोर एक आदर्शवत काम करत असलेल्या पानी फाऊंडेशनच्या कामाने एक महाचळवळ उभी केली असल्याची व या कामाने गावातील अनेक वाद विवाद व तंटे मिटत असल्याची भावना सर्वच गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. लग्न मुहूर्त असल्याने काही गावांमध्ये नववधू व वरांनी सुद्धा या महाश्रमदानात सहभाग नोंदवला.

भारतीय जैन संघटनेने या गावांना स्वखर्चाने यांत्रिकीकरणासाठी मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांनी यात उस्फुर्तपणे सहभाग घेतला आहे. पानोली येथे १०० जलमित्रांसह राज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या युवकांनी श्रमदानात सहभाग नोंदवून ३ एल.बी.एस.पूर्ण केले. त्यांना गावातील जलमित्रांनी व वॉटर हिरोनी मदत केली. येथील उत्साह पाहून गावातील कामांसाठी काही जलमित्रांनी आर्थिक मदत केली..

पिंपळगाव रोठा येथे सकाळपासून २०० जलमित्रांनी श्रमदानाला सुरुवात केली होती. १ मे रोजी होणारी ग्रामसभा येथील ग्रामस्थांनी श्रमदान करत असलेल्या डोंगरात घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला. येथे बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून गावातील ग्रामस्थांना स्फूर्ती दिली. तरुणांचं यात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

गटेवाडी गावात झालेल्या महाश्रमदानात सुमारे १ हजार जलमित्रांनी सहभाग नोंदवला आणि जवळपास ४०० घनमीटर काम केले. या कामाने एका पावसात सुमारे ४ लाख लिटर पाणी जमिनीत मुरेल एवढे काम केले गेले. या श्रमदानात सरकारी अधिकारी व राजकीय व्यक्तींनी पण सहभाग नोंदवला.

बाभुळवाडे येथे सुमारे २०० जलमित्रांनी महाश्रमदानात सहभाग नोंदवून निरनिराळ्या प्रकारचे काम केले. जातेगाव, गारगुंडी, म्हसने, कोहोकडी या गावांनी हजारो जलमित्रांसह ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग नोंदवून गावात करोडो लिटर पाणी कसे अडेल व जिरेल यासाठी काम केले.

पुणेवाडी येथे ग्रामस्थ, मुंबईकर, पुणेकर व अन्य ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांनी जलमित्रांबरोबर काम केले. येथे एका नवरदेव महाश्रमदानात सहभागी झाला होता. अंगाला हळद असलेल्या नवरदेवाने मोठ्या उत्साहात श्रमदान केले. गावातील अनेक ग्रामस्थांनी या चळवळीत आर्थिक स्वरूपाचे योगदान दिले असून असाच एकोपा या पुढे आपण ठेऊ आणि गावाला आदर्श बनवू असा संकल्प या गावाने केला आहे.

वॉटर कप स्पर्धेत गेल्या काही महिन्यांपासून कामांमध्ये आघाडीवर असणाऱ्या व पहिल्या दिवसापासून नियोजनबद्ध काम करणाऱ्या नांदूर पठार या गावात महाश्रमदानात हजारो ग्रामस्थ व जलमित्रांनी सहभाग घेतला. लानेक प्रकारची कामे तंत्रशुद्धरित्या पूर्ण करणाऱ्या या गावाने महाश्रमदानात अतिशय उत्कृष्ट काम केले. गावाबाहेरील चाकरमान्यांनी गावाच्या प्रगतीसाठी लाखो रुपये जमा करून गावाला आदर्श गाव करण्यासाठी एकोप्याने काम चालू केले आहे. राजकीय गट तट विसरून हे गाव एकदिलाने या स्पर्धेत सहभागी झाले असून असाच आदर्श सर्व गावांनी ठेवावा असा संकल्प या गावाने केला आहे.

अशा या महाचळवळीला अनेक ठिकाणांहून मदत मिळत असून नक्कीच पारनेर तालुका दुष्काळी ओळख पुसून टाकेल अशी आशा निर्माण झाली आहे. संपूर्ण देशाला २ दशकांपूर्वीच पाणलोटाचे महत्व पटवून देणाऱ्या जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या तालुक्यात उशिरा का होईना पण याचे महत्व पटले असल्याचे दिसत असून यामुळे गावे निश्चितच स्वयंपूर्ण होईल असे दिसत आहे.