सुमारे ५ हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढण्यास होणार मदत

पुणे: राज्य कृषि व पणन विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) तयार झालेल्या १२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मका उत्पादनासाठी सी.पी. सीडस(थायलंड) या मका प्रक्रिया करणाऱ्या खाजगी कंपनीशी सामंजस्य सहकार्य करार केला. एमएसीपीच्या कृषी व्यवसाय प्रोत्साहन सुविधा कक्षाची सल्लागार संस्था ग्रांट थोर्नटन यांच्या पुढाकाराने हा सामंजस्य करार करण्यात आला.
सदर सामंजस्य करार होतेवेळी एमएसीपी चे सुनील पवार (प्रकल्प संचालक), डॉ भास्कर पाटील (उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ), डॉ अभय गायकवाड (समन्वयक-कृषी पणन-एमएसीपी), विजय गोफणे (कृषिपणन तज्ञ, एबीपीएफ-एमएसीपी), व्ही. पद्मानंद (संचालक,ग्रांट थोर्नटन), राजीव कळसकर, रावसाहेब बेंद्रे व श्री एम. पटेल (प्रबंधक-सीपी सीडस) आदी मान्यवर तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
जागतिक बँक अर्थसाहाय्यीत, महाराष्ट्र राज्य कृषि व पणन विभागाच्या वतीने राज्यात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न, उत्पादकता व शेतमाल विक्रीसाठी पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याचे उदिष्ट व शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडणी करून जास्तीत जास्त नफा मिळावा, असा प्रकल्पाचा उद्देश आहे.
यासाठी राज्यात ४०० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर शेतकरी उत्पादक कंपन्यांना एमएसीपीच्या कृषी व्यवसाय प्रोत्साहन सुविधा कक्षाद्वारे (एबीपीएफ) विविध प्रकारचे सहाय्य केले जाते. एबीपीएफ कक्षाचे वतीने सल्लागार संस्था ग्रांट थोर्नटन शेतकरी उत्पादक कंपन्याचे व्यवसाय प्रस्ताव तपासणी, कृषि उद्योजकांना बँकेबल कृषि व्यवसाय प्रस्ताव तयार करून देणे, शेतकरी उत्पादक कंपन्या व व्यावसायिकांना इंक्यूबेशन सेवा देणे, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतमाल खरेदीदार यांना खरेदीदार विक्रेता संमेलनात एकत्र आणून थेट शेतमाल विक्रीसाठी प्रयत्न करणे इत्यादी कामकाज केले जाते.
सदर एबीपीएफसुविधा प्रकल्प कालावधी पर्यंत सुरु राहणार असून, एबीपीएफ कक्षाचे प्रमुख श्री जीवन बुंदे यांनी सदर सुविधेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी उद्योजक यांनी घ्यावा व कृषि क्षेत्रात गुंतवणूक वाढावावी असे आवाहन केले आहे.
सदरसामंजस्यकरारामुळे मका उत्पादित करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सध्या सुमारे १ ते १.५ हजार एकर जमीन मक्याच्या लागवडीखाली येणार आहे. तसेच या क्षेत्रात भविष्यात अजून वाढ होण्याची देखील शक्यता असून काही भागात २ हंगामात लागवड होणार असून, उत्पादित सर्व मका खरेदी होणार असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढण्यास देखील मदत होणार आहे. या सामंजस्य करारातून सी.पी. सीडस कंपनी मक्याची सुमारे ५० हजार क्विंटल खरेदी करणार आहे. तसेच शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे व उत्पादन वाढीसाठी तांत्रिक सल्ला देऊन योग्य मोबदला देखील मिळवून दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे २० ते ३०% उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.