पिक नुकसानीचे पंचनामे करा ; शेतकऱ्यांचे एक तास रास्तारोको आंदोलन

पिक नुकसान

केज तालुक्यातील कुंभेफळ येथे पिके पावसाअभावी वाळून गेल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तसेच येथील परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्‍टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी याबरोबरच अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

यामध्ये करपलेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, खरीप हंगाम 2017, रब्बी हंगाम 2018 चा पिक विमा तात्काळ देण्यात यावा, पशुधनासाठी दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा अशा मागण्यांसाठी तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांनी एक तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती.

या आंदोलनात कुंभेफळ, बंकरांजा, होळ ,चंदनसावरगाव ,सोनिजवळा, भाटुंबा, पिसेगाव ,जवळबन ,जानेगाव, ढाकेफळ, सारणी (आ) आनंदगाव (सा) व या परिसरातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. तसेच या सर्व मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांच्याकडे देण्यात आले.

पिके पावसाअभावी करपून गेल्या कारणाने पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात यावेत, चारा छावण्या सुरु करण्यात याव्या, त्याचबरोबर सन 2019- 20 खरीप हंगामातील पीकविमा तात्काळ देण्यात यावा अशी मागणी आमदार संगीता ठोंबरे यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्य सरकार पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

सांगली पूरग्रस्त भाग; गिरीश महाजन यांचा पहिला सेल्फी व्हिडीओ, त्यानंतर पाण्यात उतरले

महापुरामुळे सांगलीत विक्रीसाठी आलेल्या शेतीमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान ; बाजारपेठ उध्वस्त
Loading…