एक लाख शेतकरी विधानभवनाला घालणार घेराव

नाशिक: सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्यामुळे एक लाख शेतकरी येत्या १२ मार्चला विधानभवनाला घेराव घालणार आहेत. त्यासाठी हजारो शेतकरी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, ज्या वनजमीनी शेतकरी कसतात त्या त्यांच्या नावे करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी आणि शेतीमालाला रास्त भाव मिळावा, यांसह शेतक-यांचे रेंगाळलेले व प्रलंबीत प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेने या लढ्याची घोषणा केली आहे.

किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी मध्यवर्ती बस स्थानक चौकात जमले होते. यावेळी किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्याचे माजी अध्यक्ष आमदार जे. पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, अर्जुन आडे, सरचिटणीस डॉ. अजित नवले यांसह विविध नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतक-यांच्या या लढ्याच्या अंतर्गत किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा लाँग मार्च काढण्यात आला आहे. त्यात राज्यभरातून शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकरी नाशिकहून मुंबईला विधानसभेपर्यंत पायी जाणार आहेत.