केवळ डिजिटल फलकासाठी अडले तूर खरेदी केंद्राचे घोडे!

वेब टीम  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे तूर खरेदी केंद्र सुरू झाले नसून ते मंगळवारी सुरू करण्यात येईल, असे सचिव मोहन निंबाळकर यांनी सांगितले आहे. गोडाऊनबाहेर डिजिटल फलक करण्याचे काम न झाल्याने हे केंद्र सुरू करू, असे निंबाळकर यांनी सांगितले. मागील वर्षापासून नाफेडमार्फत तुरीची खरेदी करण्यात येत आहे. आधारभूत दराने तूर खरेदीला राज्यभर १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.

राज्यात १५९ खरेदी केंद्रे उघडण्यात आली आहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यात गावात केंद्राला ठेंगा अशी अफवा उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी आदेश आला असून, सोमवारी केंद्र सुरू होईल, असे निंबाळकर यांनी सांगितले होते.

जिल्ह्यातही तूर उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यासाठी आजवर ५६९ शेतकऱ्यांनी आधारभूत दराने विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी ही केली आहे. तुरीचा हमीभाव ५४५० रुपये प्रतिक्विंटल आहे. मागील वर्षी आलेली तूर २१ हजार क्विंटल होती. यंदाचा अंदाज ११ ते १२ हजार क्विंटलचा आहे.