पुन्हा लॉकडाऊनच्या भितीने शेतकऱ्यांच्या अंगावर काटा; वर्षभर पिकवलेल्या मालाला भावच नाही

शेतकरी

पुणे – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वाढू लागला आहे. झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या तसेच पुन्हा राज्यात लॉकडाऊन घोषित करण्याच्या बातम्या समोर येवू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हा काळ नेमका फळपिकांच्या काढणीचा काळ असल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.
गेल्या वर्षी एकीकडे शेतीमालाच्या वाहतुकीचा प्रश्न होता तर दुसरीकडे बाजार समित्या बंद असल्यामुळे मार्केटमधील माल विकता येत नव्हता, अशा कात्रीत शेतकरी अडकला असल्याचे चित्र होते. यावर्षी देखील काहीशी अशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.काही पीक काढणीला आलेली असताना लॉकडाऊनची परिस्थिती ओढवल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च निघू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

लॉकडाऊन दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याची नोंद घेण्याचं काम कृषी विभागाने केले मात्र मदत कुणाला मिळाली याचे उत्तर मात्र मिळत नाही. गेल्यावर्षी नाशवंत पीक काढणीला आली होती मात्र ती लॉकडाऊनमुळे शेतातच सडून गेली.यंदा देखील तशीच परिस्थिती आली तर या पिकांविषयी सरकारचं नेमकं काय धोरण असेल? याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

लॉकडाऊन झाल्यामुळे एकीकडे पिकवलेला सर्वांनाच विक्रीसाठी दूर शहरात नेता येत नाही आणि नेलेला माल बाजार समित्या बंद असल्यामुळे विकला जात नाही, या कात्रीत शेतकरी सापडणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्र पॅकेज जाहीर करणार का?याबद्दल देखील स्पष्टता येणे आवश्यक आहे.

सद्यस्थितीतील शेतकऱ्याची अवस्था म्हणजे त्याने पिकवलेल्या मालाला भाव नाही, व्यापारी मालाची किंमत ४०-५०% इतकी कमी करून शेतकऱ्याकडून माल खरेदी करू पाहत आहे. लॉकडाऊनमुळे सप्लायचेन विस्कळीत होते आणि शेतकरी पुरता अडचणीच्या श्रुखंलेत सापडतो. जर आता बँकेने कर्ज दिले नाही तर सावकारी कर्ज शेतकरी काढेल. परिणामी बँक कर्ज आणि सावकारी कर्ज त्याचा हप्ता असा दुहेरी बोझा त्याच्यावर पडू शकतो.

मागे राज्यातील अनेक शेतकरी स्वत:च्या शेतातील पीक उद्ध्वस्त करत असल्याचे व्हिडीओज समोर आले होते. यामध्ये द्राक्ष, संत्र्याच्या बागा उद्ध्वस्त केल्याचे व्हीडिओ प्रामुख्याने समोर आल्याचे पाहायला मिळाले.यंदा देखील तशीच परिस्थिती येतेय की काय असे वाटू लागले आहे. वर्षभर जपलेले पीक आता व्यापाऱ्यांना कवडीमोल किमतीत विकावे लागणार या भितीने शेतकऱ्याच्या अंगावर काटाच येत असल्याचे चित्र आहे.