दुष्काळ, निसर्गाची अवकृपा, नापिकी, दर आदी विविध कारणांमुळे शेतीत अनेक शेतकरी हतबल झालेले दिसतात. या पार्श्वभूमीवर बीड शहराजवळील बहिरवाडी येथील विश्वनाथ बोबडे यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक एकरातून उन्नती साधली आहे. वर्षभरातले तीन हंगाम व त्यात सुमारे सहा ते सात पिके कुशलतेने घेत आर्थिक उत्पन्नाची घडी त्यांनी सुस्थितीत नेली आहे.
बीड हा दुष्काळी जिल्हाच समजला जातो. बीड शहराच्या परिसरातील बहिरवाडी येथील विश्वनाथ बोबडे यांची बीडलगतच साडेपाच एकर जमीन होती. मात्र नवीन बाजार समितीच्या उभारणीसाठी त्यांची चार एकर जमीन गेली. त्यामुळे तिथे एक एकरच जमीन राहिली. बाजार समितीकडून संपादीत जमिनीच्या मोबदल्यातून त्यांनी शिरापूर (ता. शिरूर कासार) येथे तीन एकर जमीन खरेदी केली. मात्र बीडमध्ये घर असल्याने तेथील जमीन कसण्याची वेगळी कसरत सुरू झाली. अर्थात कष्ट व प्रयोगशील वृत्ती जपल्याने ते अशक्य नव्हते.
एक एकरातील भाजीपाला शेती
शहरानजिक असलेल्या एक एकरात मात्र नवीन काय करता येते का याचा विचार बोबडे यांच्या मनात घोळू लागला. क्षेत्र मर्यादीत असले तरी एकावेळी जादा पिके घेता यावीत, असे नियोजन त्यांनी केले. त्यासाठी २०१३ मध्ये संपूर्ण शेतीला लोखंडी अँगल आणि तारेचे ‘फाउंडेशन’ तयार केले.
पाण्याची व्यवस्था
बीड शहरातून बिंदूसरा नदीचे पाणी वाहते. त्याचाच उपयोग बोबडे यांनी केला. नदीपासूनच अगदी जवळ त्यांनी विहीर घेतली. तेथून दोन किलोमीटर अंतरावर पाइपलाइन करून त्याचे पाणी शेतात आणले. पाण्याची शाश्वती झाल्याने विविध पिकांचा विचार करणे शक्य झाले. ठिबकच्या माध्यमातून पिकांना हे पाणी देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे कडक उन्हाळ्यात आणि दुष्काळातही बोबडे यांची शेती भाजीपाला पिकांनी बहरलेली असते.
असे आहे वर्षभराचे पीक नियोजन
- वर्षभरातील तीन हंगामात सुमारे सहा ते सात पिके
- यात मेमध्ये टोमॅटो, दोडका, कारली यांची लागवड. ही पिके आॅगस्टनंतर सुरू होतात.
- सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये भेंडी, कारले आदी पिके.
- जानेवारी-फेब्रुवारीत खरबूज, कलिंगड
- दोन हंगामात फ्लॉवर
नियमित उत्पन्न देणारी शेती
बोबडे यांनी मार्केट अोळखून त्यानुसार पिकांची आखणी केली आहे. बहुतांश पिकांसाठी बेड (गादीवाफा) पद्धतीचा व पॉली मल्चिंगचा वापर केला जातो. दोन बेडमधील अंतर सहा फुटांचे असते. बेडवर टोमॅटो, दोडका अशी पिके असतात. तर मधल्या जागेत फ्लॉवरसारखे पीक असते. त्यात या पिकाची सुमारे पाच हजार झाडे बसतात. यंदा या पिकापासून त्यांना ५५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
टोमॅटोचे एकरी एकहजार क्रेट पर्यंत उत्पादन मिळते. वर्षभरात सर्व पिकांचे मिळून सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कलिंगडाचे एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते. कलिंगड व खरबूज पीकपद्धतीतून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अन्य कोणत्याही पिकांमधून या भाजीपाला पीकपद्धतीप्रमाणे उत्पन्न शक्य नसल्याचे बोबडे म्हणाले. कारली, दोडका ही पिके हिवाळ्यात येत असल्याने त्यांना दर चांगले मिळतात. उदा. भेंडी, कारले यांना किलोला ५० रुपये तर दोडक्याला किलोला ३० रुपयांपासून ६० ते ७० रुपयांपर्यंत दर मिळतो.
बाजारपेठ केवळ दोन किलोमीटवरवर असल्याचा फायदा असा होतो, की तोडणी केलेला ताजा माल केवळ काही कालावधीत पोचता करता येतो. ताज्या व दर्जेदार मालाला किलोमागे काही रुपये जास्तीचेही मिळतात. वेगवेगळ्या हंगामात पिके असल्याने प्रत्येक हंगामात ताजे उत्पन्न हाती येते. प्रत्येक पिकासाठी साधारणतः ५० हजार रुपयांचा खर्च होतो. फ्लॉवरचे डिसेंबरच्या काळात उत्पादन जास्त येते. मात्र या काळात मागणी कमी राहते. याउलट दुसऱ्या हंगामात त्याचे उत्पादन कमी मात्र मागणी चांगली राहते असा बोबडे यांचा अनुभव आहे.
ठिबकद्वारे खतमात्रा
ठिबकद्वारेच खते दिली जातात. त्याचबरोबर एचटीपी पंप, स्प्रे गन यांचा वापर केला जातो. बोबडे दांपत्य पूर्णवेळ भाजीपाला शेतीत राबते. केवळ दोन मजुरांचे साह्य घेतले जाते. त्यामुळे शेतातील खर्च कमी करणे शक्य झाले आहे.
संपर्क : विश्वनाथ बोबडे- ९७६३३७२८५७