उर्वरित शेतकरी कर्जमाफीबाबत कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा…

dada bhuse news

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 30 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 लाखांच्या आतील कर्ज असलेले शेतकरी पात्र आहेत. 19 लाख शेतकऱ्यांचे 12 हजार कोटी रुपये खात्यावर वर्ग झाले आहेत. 11 लाख शेतकऱ्यांचे साडेनऊ हजार कोटी रुपये लॉकडाऊनमुळे थांबलेले होते. मात्र लॉकडाऊन थांबल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल. या शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे सरकार भरणार आहे. त्यांना पिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

खरीप हंगाम २०२० नियोजनाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सह संचालक दिलीप झेंडे, दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अग्रणी बँकेचे अग्रणी व्यवस्थापक आनंद बेडेकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

दरम्यान, राज्यात मुबलक बियाणं आणि खतं उपलब्ध आहेत. युरिया 50 हजार मेट्रिक टन बफर स्टॉक केला जाणार आहे. त्यामुळं बियाणं आणि खताची टंचाई येणार नाही. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार आहे. काही ठिकाणी 50 टक्क्यांपर्यंत, तर काही ठिकाणी 10-15 टक्के पीक कर्ज वाटप झालंय. असंही दादा भुसे म्हणाले होते.

यासोबतच शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणं दिलं जात आहे. त्यामुळे एका गोणीमागे 10 ते 30 रुपये शेतकऱ्यांचा फायदा होतोय. कापूस, सोयाबीन, तूर, कांदा, मका, ज्वारी खरेदीचा आढावा घेण्यात आला आहे. 15 जूनपर्यंत खरेदी पूर्ण करायची सूचना केली असून ते उद्दिष्ट सफल होईल, असंही त्यांनी म्हटलं.

प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी – दादा भुसे