कृषीमंत्र्यांनी नागपुरी संत्रा व मोसंबी उत्पादकांना न्याय द्यावा – अनिल देशमुख

अनिल देशमुख

नागपुरी संत्र्याचे सर्वाधिक लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ नागपूर विभागात संत्र्याची लागवड होते. यंदा भूजल पातळीत झालेली घट आणि तीव्र उन्हाच्या झळांमुळे संत्रा बागा जळण्याचे प्रकार विदर्भात सर्वदूर घडले. मोर्शी, वरुड तालुक्‍यातील संत्रा बागांना याचा सर्वाधिक फटका बसला. नागपूरच्या काटोल, कळमेश्‍वर तालुक्‍यातील संत्रा बागांची स्थितीदेखील अशीच आहे.

आता विदर्भातील भाजपाचे नेते डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे कृषी मंत्रिपद दिले आहे. दिवंगत पांडुरंगजी फुंडकर यांच्या नंतर राज्यात जवळपास दोन-अडीच वर्ष स्वतंत्र कृषीमंत्री नव्हते पण आता राज्याला स्वतंत्र कृषिमंत्री लाभलेले आहे. कृषिमंत्री स्वत: संत्रा व मोसंबीचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या सर्व समस्या माहिती आहते. यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादकांना कृषिमंत्रीकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

नोटाबंदीच्या काळात तर उत्पादन होऊन संत्र्याला हवा तसा भाव मिळाला नव्हता. वाहतुकीचा सुध्दा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी संत्रा व मोसंबी रस्त्यावर फेकली होती. दुष्काळामुळे यावर्षी संत्रा व मोसंबीचे उत्पादनच झाले नाही. राज्य सरकारच्या वतीने बहुवार्षिक पिकांना मदत जाहीर करण्यात आली. कृषीमंत्री बोंडे यांच्यकडून  वरुड व मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानाची मदत मिळाली. परंतु या मदतीपासून नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. आता तर पाण्याअभावी संत्रा व मोसंबीची झाडे मोठ्या प्रमाणात वाळली आहेत. परंतु याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अद्यापही देण्यात आलेले नाहीत.

आता नव्याने संत्रा लागवड केल्यानंतर उत्पादनासाठी पाच ते सहा वर्षे शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागा तरल्या त्यांच्याकडील आंबिया बहार उन्हामुळे गळाला. ही बाब लक्षात घेत अडचणीतील शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

२०१२ मध्ये मराठवाड्यातील जालना जिल्हात दुष्काळ पडला असता तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी संत्राबागा वाचविण्यासाठी प्रति हेक्टर ३० हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत ६० हजार रुपयाची मदत दिली होती. अशीच मदत भाजपा सरकार करेल अशी अपेक्षा होती. परंतु याकडे सुध्दा केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांचा मतदारसंघ संत्रा व मोसंबीसाठी प्रसिध्द आहे. बोंडे यांनीच यापूर्वी संत्रा, मोसंबीसाठी आवाज उठविला आहे. त्यामुळे आता ते न्याय देतील, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.

किवी फळ खाण्याचे हे गुणकारी फायदे

सफरचंदामुळे होणारा आरोग्यदायक लाभ