राज्यात गारठा वाढला

पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी असलेल्या उकाड्यानंतर अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी (ता. ८) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. ९) राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर रविवारपासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा आल्याने जवळपास आठवडाभर राज्यातील थंडी कमी झाली होती. मात्र राजस्थान आणि गुजरातमध्ये असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. पाकिस्तान आणि जम्मू- काश्मीरलगत पश्‍चिमी चक्रावाताची स्थिती आणि त्यापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे.

यामुळे गुजरात किनारपट्टी, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि परिसरावरून गुजरात, महाराष्ट्राकडे थंड वाऱ्यांचे प्रवाह येत आहेत. परिणामी, मध्य महाराष्ट्र, कोकणात अनेक ठिकाणी, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमान पुन्हा सरासरीपेक्षा १ ते ५ अंशांची खाली घसरले आहे. नगर, महाबळेश्‍वर, नाशिक येथे तापमान ९ अंशांपर्यंत पुणे, मालेगाव येथे १० अंशांपर्यंत खाली आल्याने गारठा चांगलाच वाढला आहे. आज (ता. ९) गुजरात आणि मध्य प्रदेशात रविवारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता असून, राज्याच्या उत्तर भागात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. यातच पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने, आज (ता. ९) विदर्भात, तर उद्यापासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. ८) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १०.२ (-१.२), नगर ९.६ (-३.४), जळगाव १२.४ (-०.४), कोल्हापूर १६.५ (०.४), महाबळेश्‍वर ९ (-५), मालेगाव १०.४ (-०.७), नाशिक ९.८, सांगली १४ (-१.५), सातारा १२.९ (-०.७), सोलापूर १६.६ (-१.१), सांताक्रूझ १४.४ (-३.१), अलिबाग १५.५ (-२.१), रत्नागिरी १८.३ (-०.७), डहाणू १६.४ (-१.२), आैरंगाबाद १० (-३.५), परभणी १४.८ (-१.०), नांदेड १८.० (३.८), अकोला १४.७ (-०.७), अमरावती १५ (-१.३), बुलडाणा १२ (-४), चंद्रपूर १७.६ (१.६), गोंदिया १४.५ (-०.५), नागपूर १४.८ (०.१), वर्धा १६ (१.४), यवतमाळ १५.४ (-१.०).