दवबिंदू गोठले, थंडीचा कहर, द्राक्षासह पिकांचे मोठे नुकसान

राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. अनेक भागात दवबिंदू गोठून, त्याचे बर्फात रुपांतर झाले. महाबळेश्वरला वेण्णा लेक परिसरात तापमान शून्य अंशावर गेले असून यासह पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात ५ अंश किंवा त्यापेक्षाही खाली तापमान नोंदले गेले आहे. तापमानाची या घटीचा द्राक्ष, स्ट्रॉबेरीसह फळबागा आणि ऱब्बी पिकांना चांगलाच झटका बसला आहे. उद्या सुद्धा कडाका कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.

महाबळेश्वर ० अंशावर, निफाड ३, दवबिंदू गोठले. नाशिक ४, पुणे ५.१, परभणी ७.३, मुंबई ११ अंशावर आहे. महाबळेश्वर येथील नागरिकांनी वेण्णा लेक परिसरात या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव घेतला. काही दिवसांपूर्वी राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच थंडीने पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. अशातच महाबळेश्वरमध्ये थंडीने उच्चांक गाठला. महाबळेश्वर येथे आज या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले. येथील बोट क्लबच्या जेटींवर, स्ट्रॉबेरीच्या मळ्यात, फुले, पाने, गाड्यांच्या टपावर, घराच्या पत्र्यांवर तसेच घराच्या बाहेर मळ्यामधील बादल्यांमध्ये साठवणूक केलेल्या पाण्यावर बर्फाचा पापुद्रा तयार झाला होता.

पुण्यात मोसमातील निचांकी तापमान

पुणे शहरात पुन्हा थंडीची तीव्रता वाढली असून, आज (शनिवार) यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. शहरात किमान तापमान 5.1 अंश सेल्सिअस इतके नोंदले असून, पुढील तीन दिवसांमध्ये आणखी थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

राज्यातील पारा घसरला असून, शुक्रवारी नीचांकी तापमान नगर येथे 9.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. आज त्याखाली तापमान गेले असून, निफाडला सर्वांत कमी 4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर, महाबळेश्वरला -2 इतके तापमान होते. अनेक ठिकाणी हिमकण साचले होते. पुण्यातही थंडीचा कडाका जास्त होता.

पुण्यात गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव होता. त्यामुळे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेला किमान तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. पण, या बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रभाव ओसरला आहे. त्याच वेळी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडी पडत आहे. शहरातील पुढील तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहणार असल्याने थंडीचा कडाका अजून वाढेल, असा अंदाज आहे.