सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सळो की पळो करून सोडणार : डॉ.अजित नवले

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- तमाम भारतीयांना फसवून ४ वर्षांपूर्वी देशात सत्तेत व राज्यात सत्तेत आलेले भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून हे सरकार फक्त भांडवलदार व उद्योगपती धार्जिणे आहे, यांना शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. देशात ८० टक्के शेतकरी राहतो आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे, आणि आज हाच शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या दुधाला, शेतमालाला रास्त भाव नाही, या सर्व समस्यांनी शेतकरी पिचला असून आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय या सरकारने ठेवला नाही, आता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असून, सरकारला आता मागण्या पूर्ण होइपर्यंत सळो की पळो करून सोडणार आहे, तसेच शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते  डॉ.अजित नवले यांनी सरकारला दिला.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे आज सकाळी ८ वाजता छावा वारियर्स व कळस बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने शेतक-यांच्या प्रश्नावर रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी कोल्हार घोटी राजमार्ग सुमारे ४ तास अडवून ठेवला होता, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कळस बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी आपापली सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन या रास्तारोको आंदोलनाला पाठिंबा दिला.

शेतकरी नेते किसन सभेचे सचिव डॉ.अजित नवले म्हणाले, या सरकारच्या काळात कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नाही, शेतीमध्ये उत्पन्न येण्यासाठी केलेला खर्च सुद्धा फिटत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी संघटना शेतक-यांसाठी लढा उभारीत असून सर्व शेतक-यांनी या लढ्यात सहभागी होऊन ही चळवळ अधिक व्यापक करावी, असेही आवाहन डॉ.अजित नवले यांनी केले. या रास्तारोको आंदोलनामुळे कोल्हार घोटी राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी रास्तारोको आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे डॉ.संदीप कडलग, सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, निवृत्ती मोहिते, अरुण वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे उपस्थित होते. यावेळी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी सूत्रसंचालन केले.