नागरिकांना मोफत वीज देण्यास अजित पवारांचा विरोध; असले फुकटचे धंदे करू नका

अजित पवार

राज्यातील नागरिकांना १०० युनिट वीज मोफत देण्यावरून महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना येत्या वर्षभरात १०० युनिट वीज मोफत देण्याचा मानस व्यक्त केला होता. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नितीन राऊत यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. त्यामुळे मोफत वीज देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचे दिसत होते. नितीन राऊत हे अभ्यास करत आहेत. गरीबांना मोफत वीज देता येईल का, याचा अभ्यास ते करत आहेत. सध्या याची चाचपणी सुरु असून त्यामध्ये काहीच गैर नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले होते.

मात्र  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन राऊत यांना फटकारले आहे. राज्य सरकारने असले फुकटचे धंदे करू नयेत, असे खडे बोल सुनावले होते. त्यामुळे आता महाविकासआघाडीचे सरकार याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

जितेंद्र आव्हाड म्हणतात, हा माझा देश नाही!

अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणेच विजेचा लाभ सर्वांना घेता यावा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही वीजेपासून वंचित राहू नये म्हणून १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यास महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. शक्य झाल्यास भविष्यात हा आकडा २०० युनिटपर्यंत वाढवण्यात येईल.’ अशी माहिती महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटरवरून दिली होती.

‘येत्या वर्षाअखेरपर्यंत ही योजना लागू करण्याचा मानसही ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केला होता.  निर्णय झाल्यास या योजनेसाठी दर वर्षी सुमारे ७ हजार १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ‘महावितरण’ आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता हा भार कोण सोसू शकणार, असा प्रश्न उभा राहिला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोफत वीज मिळणार, की हे नवे ‘गाजर’च ठरणार, अशी चर्चा सुरू आहे.

राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक