मतदार तुम्हालाही सत्तेतून घालवतील- अजित पवार

नागपूर : कापसावरी बोंडअळी, धान पिकावरील तुडतुडा अशा रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, कर्जमाफीच्या जाहीराती करण्यात सरकार समाधान मानत आहे. आज राज्यातील एक तरी शेतकरी दाखवा जो समाधानी आहे, असे आवाहन करीत शेतकºयांच्या जिवाशी असे खेळत राहिलात तर तीन वर्षांआधी मतदार राजाने जसे आम्हाला सत्तेतून दूर केले तशी वेळ आता तुमच्यावर यायला वेळ लागणार नाही असा इशारा विधीमंडळाचे पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

सत्ताधा-यांकडून आलेल्या 293च्या प्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले, मागील काही वर्षांपासून विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करत होते. मात्र, मुख्यमंत्री आमच्या मागणीला कवडीचेही महत्त्व देत नव्हते. कर्जमाफीमुळे केवळ बँकांचा फायदा होतो. त्याचा शेतक-यांना काहीही लाभ नाही असा आरोप आमच्यावर करायचे.

कर्जमाफीची मागणी करण्यासाठी आवाज उठविणाºया आमच्या एकोणवीस आमदारांना मागील अधिवेशनात निलंबित करण्याचा डाव या सरकारने रचला होता. शेवटी राज्यातील शेतकºयांना आंदोलन करण्याची वेळ आली. आघाडी सरकारच्या एवढ्या वर्षांच्या इतिहासात शेतक-यांनी कधीही स्वत:हून आंदोलन केले नाही. अशी वेळ येणे हे सरकारचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कर्जमाफीची घोषणा होउनही ती प्रत्यक्ष शेतक-यांना मिळाली नसल्याने आत्महत्त्या थांबायचे नाव घेत नाही. राज्यातील कुठलाही शेतकरी या सरकारच्या काळात समाधानी नाही. कर्जमाफीने सर्व प्रश्न सुटणार नसून सरकाने पिकांच्या हमीभावाकडे लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.