अलर्ट! राज्यातील ‘या’ भागात येत्या 12 तासात चक्रीवादळ धडकणार

पाऊस

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत 15 आणि 16 मे रोजी पर्जन्यवृष्टीसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आली आहे.

गोवा आणि कोकण किनारपट्टीपासून सध्या हे वादळ साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे. गोवा रत्नागिरी-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट तर अन्य समुद्र किनार्‍यावर यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही जोरदार तयारी केली आहे. पालिकेने यंत्रणा सज्ज केली आहे. समुद्र किनाऱ्यावरील वस्त्या निर्मनुष्य करण्याचं काम सुरू आहे.

पालिकेने 384 झाडांची छटणी केली आहे, AMC सोबत मिटिंग झाल्या आहेत. आपण सर्व परीने तयार आहोत. पण या चक्रीवादळाचा तडाखा मुंबईला बसणार नाही. शहरात पाणी घुसू शकते, तिथे पंप ठेवले आहेत. मुंबईतील सहा चौपाट्यांवर जीवरक्षक पथके तैनात केली आहेत. विजेच्या तारांचा शॉक लागू नये यासाठी प्रवाह खंडित केलाय. वांद्रे-वरळी सी लिंकही बंद केलाय. फायर ब्रिगेड स्टँडबायवर आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे, तर उद्या ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मुंबईत कोविड सेंटरला पर्यायी विद्युत व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. गरज असेल तर रुग्ण हलवले जातील. Ndrf आणि नेव्ही विभागाकडून गरज लागली तर मदत देखील घेतली जाणार आहे.

तसेच वेळ पडल्यास वरळी, माहिमसह इतर कोळीवाड्याजवळ राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. यादरम्यान नागरिकांनी काटेकोरपणे आवश्यक ती दक्षता घ्यावी. त्याचप्रकारे नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असेही निर्देश पालिकेने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –