सर्व विकास योजनांची अंमलबजावणी विहित वेळेत करावी – सुभाष देसाई

सुभाष देसाई

यंत्रणा, नागरिकांनी सतर्कता आणि खबरदारी कायम ठेवावी

औरंगाबाद – जिल्ह्यात कोविड संसर्ग आटोक्यात ठेवण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे ही समाधानाची बाब असली तरीही संसर्गाच्या वाढत्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्कतेने सर्व उपाययोजना सुरू ठेवाव्यात, असे निर्देशित करून जिल्ह्यातील विविध विकास योजनांची अंमलबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील विकास कामे, जिल्हा परिषद तथा मनपाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे, यांच्यासह आरोग्य, सहकार, जिल्हा परिषद, समाज कल्याण यांसह इतर संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले, कोरोना संसर्गाबाबत जिल्ह्यात उत्तम पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्वांनी खबरदारी बाळगावी. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होत असली तरीही सर्व उपचार सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू ठेवाव्यात तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, अशा सूचना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

तसेच कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील पीक उत्पादकता, पेरणी व इतर बाबींची माहिती घेऊन केंद्र शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादन या योजनेमध्ये जिल्ह्यात मका, भाजीपाला यामध्ये काम करण्यास संधी असून त्यादृष्टीने उद्योग विभाग व जिल्हा प्रशासन यांनी एकत्रित प्रयत्नातून काम करावे. यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योगासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्राधान्याने जमीन देण्याचे धोरण असून त्याचा लाभ ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजने अंतर्गत घ्यावा, असे श्री. देसाई यांनी यावेळी संबंधितांना सूचीत केले.

तसेच महानगरपालिका अंतर्गत सर्व विकास कामे विहित मुदतीत व दर्जेदार होण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. दिव्यांग तसेच विद्यार्थी यांच्यासाठी प्राधान्याने निधीची तरतूद करून लाभ मिळून द्यावे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी निर्देशित केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोविड नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, उपलब्ध पुरेसा औषध साठा तसेच कोरोना लसीकरणासाठी प्रथम टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील शासकीय तसेच खासगी दोन्ही क्षेत्रातील डॉक्टर ते वॉर्डबॉय पर्यंतच्या सर्व जणांची नोंदणी लसीकरणासाठी करण्यात येत असल्याचे सांगून यासह प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या सर्व पुर्वतयारी बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली.

महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपातर्फे पूर्ण करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती देऊन पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थ्यांना घरे मिळणे, नविन पाणीपुरवठा योजना तसेच सफारी पार्कसाठी जागा संपादन करुन एप्रिल 2021 पर्यंत भूमिपुजन करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले तसेच संत एकनाथ नाट्यगृहाचे काम फेब्रुवारी 2021 मध्ये पुर्ण होणार असून हॉकर्स परवाना,  हॉकर्स झोनला परवानगी देणे इत्यादी कामे मार्च 2021 मध्ये पूर्ण होण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उंची वाढविण्या संदर्भात लोकप्रतिनिधींच्या सूचना नूसार लवकरच काम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पांडेय यांनी दिली.

जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजना अंतर्गत प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात प्रती व्यक्ती प्रतीदिन 55 लीटर पाणी उपलब्ध होण्यासाठी नळजोडणीचे 53.50 उद्दीष्ट पूर्ण केल्याचे सांगितले. या योजने अंतर्गत प्रस्तावित मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील मंजूर 13 योजनांपैकी 8 योजनेतील पाणीपुरवठा सुरु असून 4 योजना प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.

तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (स्वतंत्र नळ, पाणीपुरवठा योजनेवर सोलार पंप बसविणे) सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना या अंतर्गत 38 योजना पूर्ण करुन दुर्गम भागात पाणीपुरवठा केला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण या विभागातील कामांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा नियमितपणे सुरू करण्यात आल्या असून सध्या विद्यार्थ्यांची 13 टक्के उपस्थिती असल्याचे, श्री. गोंदावले यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विकेल ते पिकेल या योजनेअंतर्गत जिल्ह्यात नियोजनबद्ध काम करण्यात येत असून लॉकडाऊन काळापासून आजतागायत सूरू असलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक शेतमाल विक्री उपक्रमांतर्गत आजपर्यंत 21 कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचे सांगून कृषीच्या विविध योजना अंमलबजावणीची माहिती कृषी अधीक्षक डॉ. मोटे यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या –