नोंदणी केलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांचे भरड धान्य खरेदी करावे – डॉ राजेंद्र शिंगणे

डॉ राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत जिल्ह्यात भरडधान्य खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये मका, ज्वारी आदींचा समावेश आहे. मक्याचे उत्पादन घाटाखालील तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नोंदणी केलेल्या पूर्ण शेतकऱ्यांचा ज्या धान्यासाठी नोंदणी केलेली आहे, ते धान्य खरेदी करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात भरड धान्य खरेदीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली.  त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा मार्केंटींग अधिकारी श्री. शिंगणे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. बनसोडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे,  निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

उद्दिष्टानुसार मका खरेदी करताना मुदत संपल्यास  मुदतवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, मका उत्पादक शेतकऱ्यांना मुदत संपल्यास त्यानुसार आधी माहिती द्यावी. कुणीही नोंदणीकृत शेतकरी खरेदीपासून वंचित राहू नये. या खरेदीमध्ये शेतकऱ्यांचाच माल खरेदी करावा. त्यासाठी शेतकरी असल्याची खात्री करून घ्यावी. खाजगी व्यापाऱ्यांचा माल खरेदी करू नये. मक्यासाठी गोदामे कमी पडत असल्यास खाजगी गोदामे घ्यावीत.

तसेच नियमानुसार खाजगी गोदामे आवश्यकता वाटल्यास अधिग्रहीत करावी. शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी करावा.  खरेदी केलेल्या मालाचे चुकारे लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी शेतकऱ्यांची बँक खाते क्रमांक योग्य असल्याची खात्री करावी.  तसेच नवीन खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव आले असल्यास त्या प्रस्तावांची छाननी करून नियमानुसार असलेल्या प्रस्तावांना मान्यता द्यावी.

ते पुढे म्हणाले, मलकापूर येथील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी मलकापूर येथील कापूस खरेदी सोमवारपासून कुठल्याही परिस्थितीत सुरू करावी. कापूस खरेदी करताना सर्व ठिकाणी सारखी नियमावली असावी. कापसाचे ग्रेडींग जिनींगमध्येच करावे. कापसाचे मॉईश्चर बघताना संवेदनशीलता ठेवावी. जिनींग व्यवस्थापकांनी कापूस खरेदीसाठी पूर्वतयारी करावी. कापूस खरेदीसाठी गोदाम किंवा साठवणूक जागेची व्यवस्था करावी.  बैठकीला सीसीआयचे अधिकारी, ग्रेडर, संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –