शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन

कापूस खरेदी केंद्र

औरंगाबाद – मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे सुरुवातीला जोमाने आलेल्या कपाशीला फटका बसला आहे. परिणामी कापसाचे नुकसान झाले आहे. त्यात ऐन सणासुदीचे दिवस समोर आले असताना अद्याप शासनाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या कापूस खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्याकडे 30 ते 35 रुपये किलो दराने विक्री करावा लागत आहे. तरी शासकीय हमीभावाने कापसाची खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबवता येईल.

मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारे नुकसान लक्षात घेता, शासकीय हमी भावाने कापूस खरेदी करण्यासाठी केंद्र सुरू करा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. दुपारी एकच्या सुमारास शहानूर मिया दर्गा रस्त्यावरील भारतीय कापूस निगम कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेला कापूस ओढून घेताना पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये झटापट झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कापूस फेकून आपला रोष व्यक्त केला. आज शेतकरी शांत आहे मात्र शासनाने लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाहीत तर मात्र शेतकरी आपला उग्ररूप दाखवेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी दिला.

सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरू असते तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला असता, मात्र शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी कापूस केंद्रावर कौडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू करा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस जप्त करताना पोलीस आणि शेतकरी यांच्यात झटापट झाली.

महत्वाच्या बातम्या –