नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

जायकवाडी धरण

नांदेड – जायकवाडी प्रकल्पातून  सोडण्यात येत असलेला विसर्ग 10 हजार क्सुसेक गोदावरी नदीत सोडण्यात आलेला आहे. तर निम्न दुधना प्रकल्पातून 30 हजार 324 क्युसेक विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 21 हजार 971 क्सुसेक विसर्ग सुरु आहे. दिग्रस बंधाऱ्यातून 3 लाख 74 हजार 341 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिध्देश्वर) पाणलोट क्षेत्रातून सिध्देश्वर धरणाखाली पुर्णा नदीत 1 लाख 1 हजार 795 क्सुसेक विसर्ग सुरु आहे. पूर्णा ब्रीजजवळ 1 लाख 43 हजार 999 क्युसेक विसर्ग सुरु आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने विसर्गात वाढत होत आहे. सद्य:स्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 100 टक्के भरले आहे.  त्या प्रकल्पातून 4 लाख 57 हजार 320 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पोचमपाड प्रकल्प भरल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो.

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 15 दरवाज्यातून 2 लाख 47 हजार 375 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल. संततधार पावसामुळे येव्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुन्या पुलाजवळ सध्याची पाणीपातळी 352 .85 मी. एवढी आहे. इशारा पाणीपातळी 351 मी. तर धोका पातळी 354 मी. इतकी आहे. गोदावरी नदीतून विष्णुपुरी बंधाऱ्यामागील प्रकल्पातून अंदाजे 5 लाख 18 हजार 340 क्युसेक प्रवाह सुरु असून टप्याटप्याने हा विसर्ग शहरातून प्रवाहित होणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत (354 मी. ) ने वाढण्याची शक्यता आहे.

विष्णुपुरी प्रकल्पातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही 100 टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस , अतिवृष्टी झाल्याने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. उर्ध्व मानार प्रकल्पातून आज सकाळी 11 वाजता 2 हजार 369 क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास तेथील 10 दरवाजे उघडून 48 हजार 204 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे.

वरीलप्रमाणे गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी केले आहे. तसेच वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या या दुरध्वनी क्रमांक 02462-263870 नियंत्रण कक्षातून मिळेल.

महत्वाच्या बातम्या –