अण्णा हजारे यांची २० जानेवारीला आटपाडीत सभा

सांगली : लोकपाल व लोकनियुक्त यांची नियुक्ती करावी व शेतीमालाला रास्त हमीभाव मिळावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील अण्णा हजारे यांची पहिली सभा २० जानेवारी रोजी आटपाडी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी दिली.

 प्रत्येक राज्यातील कृषीमूल्य आयोग अभ्यास करून कृषीमूल्य निर्धारित करून राज्यातील कृषीमूल्य अधिकारी केंद्र व केंद्रीय कृषीमूल्य आयोग व केंद्र शासन यांच्याकडे पाठवितात. पण केंद्र शासनाने आजअखेर यावर कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. या प्रमुख मागणीसाठीच अण्णा हजारे यांनी सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली आहे. याशिवाय शेतक-यांच्या मुलभूत समस्या, शेतीमालाला हमीभाव, वीज व पाण्याची कायमस्वरूपी समस्या सोडविणे, शेतक-यांना दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करावी व केंद्र व राज्य शासनाने शेतक-यांचा १०० टक्के शेतीमाल हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणीही करण्यात येणार आहे. आटपाडी येथील बचतधाम क्रीडांगणावर २० जानेवारी रोजी ही सभा होणार असल्याचेही कल्पना इनामदार यांनी सांगितले.