राज्यातील कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी पणन महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

पुणे: महाराष्ट्र राज्य हे फळे व भाजीपाल्यासाठी देशामध्ये अग्रेसर आहे. राज्यात पिकणाऱ्या शेती मालाला देश-प्रदेशात मोठी मागणी असते. परंतु इतर राज्यातील बाजारपेठांची योग्य माहिती नसल्याने अनेकवेळा शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. हीच गरज लक्षात घेता राज्य कृषी पणन महामंडळाकडून देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी पहिल्यांदाच परराज्यात व्यापार प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रतिनिधी इतर राज्यातील बाजारपेठांचा अभ्यास करून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यामध्ये पिकणारा शेतीमाल देशातील इतर भागामध्ये पाठवल्यास शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळतो. त्यामुळे निर्यातीबरोबरच देशांतर्गत बाजारपेठांचा शोध घेवून तेथे राज्यातील शेतमाल पाठवल्यास शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ होणार आहे. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन बाजारपेठांची गरज, त्या राज्यातील खरेदीदार यांची माहिती मिळणे अत्यंत गरजेचं असल्याने सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेनुसार देशातील सहा राज्यात व्यापार प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले कि, महाराष्ट्रातील शेतीमाल उत्पादनवाढीसाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकार आणि पणन विभागाकडून नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. राज्यात उत्पादीत होणाऱ्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन महामंडळाकडून सहा राज्यात व्यापार प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रतिनिधी हरियाना, पंजाब, तामिळनाडू, नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थानमध्ये काम करणार असून. इतर राज्यातील मागणी असलेल्या बाजारपेठांचा अभ्यास करून आपल्याकडील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच निर्यात संस्थाना माहिती पुरवली जाणार आहे.

सुरुवातीस ८ राज्यात कृषी पणन महामंडळाच्या वतीने ४५ दिवसांसाठी व्यापार प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली असून, या कालावधीमध्ये येणाऱ्या अनुभव लक्षात घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकरी आणि निर्यात संस्थांनी संबंधित व्यापार प्रतिनिधींशी संपर्क साधून शेतमाल व्य्क्रीचे नियोजन करण्याचे आवाहन पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले आहे.