सादिम्यान… एक अवलिया

पाणी अडवा पाणी जिरवा ह्या उक्तीला प्रत्यक्षात आपण खूप कमी वेळा बघतो. झाड किती लावली ह्यावर न अवलंबून राहता त्यांची देखभाल करून हि उक्ती प्रत्यक्षात उतरवणारा एक हिरो आपल्या देशात नाही पण आपल्या बाजूच्या देशात म्हणजे इंडोनेशियात आहे. त्याने अस काही कार्य केल आहे आणि अजून करत आहे कि ज्यामुळे पूर्ण गावाचा नक्षा बदलून गेला आहे. झाड लावली म्हणजे सगळ संपल अस होत नाही. तर त्याची वाढ करून पाण्याला मातीत जिरवणारा ह्या हिरोच नाव आहे सादिम्यान.

दाली हे छोटस गाव वोनोगिरी जिल्ह्यात जावा प्रांतात, इंडोनेशिया इकडे वसल आहे. माउंट लावू च्या उतारावर वसलेल हे गाव गेन्डोल जंगलाचा भाग आहे. संपूर्ण जंगलातील ह्या गावाला निसर्गाचा आणि वृक्षवल्लीचा परीस्पर्श झाल्यामुळे एक सुंदरता होती. गावात कधीच पाण्याची वानवा नव्हती. पण १९६४ साली लागलेल्या आगीत ह्या गावातील जंगल पूर्णपणे भस्मसात झाल. वाढणारी लोकसंख्या आणि जमिनीची होणारी धूप ह्यामुळे इथल्या निसर्गाच्या ठेव्याला वाळवी लागली. उन्हाळ्यात पाण्याच दुर्भिक्ष तर पावसाळ्यात येणारे पूर ह्यामुळे इथल्या गावातील लोकांच जगण अतिशय कठीण झाल.

Sadiman_

सादिम्यान ह्या गावातला एक साधारण शेतकरी. हातावर कमावून दोन वेळच पोट भरणारा. दरवर्षीच्या ह्या सुका दुष्काळ आणि ओल्या दुष्काळाने हतबल झालेला. पण म्हणून कर्जाच्या ओझ्याखाली दबून आपल जीवन संपवून टाकणाऱ्या मधला तो नव्हता. त्याच मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हत. स्वतःची आणि गावाची परिस्थती बदलण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार त्याच्या मनात सतत सुरु होता. सादिम्यान ने विचार केला कि काय वेगळ झाल. १९६४ आणि आता असा काय फरक पडला कि आपल्या गावाच आयुष्य बदलवून गेल. निसर्गाचा प्रकोप झाला कि आपण निसर्गापुढे झुकलो. नक्की काय?

विचारांच्या ह्या साखळीत त्याला जे समजल ते पुढल्या काही वर्षात त्याच आयुष्य बदलवणार होत. जंगलातील आगीने पूर्ण वृक्षसंपदा नष्ट केली होती. वृक्ष नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी आणि माती वाहून जाऊन पूर यायचा तर पाणी न मुरल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याच दुर्भिक्ष जाणवायच. त्याला मूळ समस्या कळली पण आता करायचं काय? सरकार काहीतरी करेल ह्यापेक्षा आपण काय करू शकतो का? ह्या विचाराने त्याची झोप उडवली. त्याला उत्तर मिळाल होत पण आता गरज होती ते जमिनीवर निर्माण करण्याची. सादिम्यान ने ठरवलं आपण बदल घडवायचा. त्याने बघितल होत कि वडाच झाड हे प्रचंड पाणी मुरवू शकते. तसेच त्याची मूळ जमिनीची धूप कमी करू शकतात. पण समस्या होती कि वडाच्या झाडाच्या बियांची किंमत होती ५०,००० इंडोनेशियन रुपया म्हणजे जवळपास ४ अमेरिकन डॉलर ( ३०० भारतीय रुपये ). एका गरीब शेतकऱ्याला हे पैसे कसे परवडणार?

sadiman

सादिम्यान हार मानणाऱ्या मधला नव्हता त्याने युक्ती लढवली. आपल्या शेतात लवंगी च्या झाडाच बी निर्माण केल. १० लवंगीच्या झाडाच्या बिया म्हणजे १ वडाच्या झाडाची बी अस करत त्याने माउंट लावू च्या भकास जागेवर एक एक करत झाड लावायला सुरवात केली. नुसत झाड लावून तो थांबला नाही तर त्याची निगा राखायला सुरवात केली. नेहमीप्रमाणे जगरहाटीच्या विरुद्ध तुम्ही काही केल कि नाक वाकड करणारे असतात. सादिम्यान ला अनेकांनी मुर्खात काढल. त्याने पेरलेल्या बिया जमिनीतून काढून टाकून अनेकांनी कुत्सिक मानसिकतेच दर्शन दिल. पण सादिम्यान थांबला नाही. आपल्या लक्षावर काम करत राहिला. एक, दोन नाही तर तब्बल २० वर्ष. न थकता, न घाबरता, लोकांच्या नजरांना तोंड देत आपल काम करत राहिला. १०० हेक्टर च्या त्या जमिनीवर त्याने मोजदाद केली नसेल पण ११,००० पेक्षा जास्त झाड लावली आणि जगवली.

त्या ११,००० पेक्षा जास्त विपुल वृक्षांनी जेव्हा २० वर्षांनी आपली फळे द्यायला सुरवात केली तेव्हा सादिम्यान फक्त इंडोनेशियात नाही तर जगभरात जाऊन पोहचला. ह्या निर्माण झालेल्या वृक्षसंपत्तीने पावसाळ्यात पाणी जमिनीत मुरवायला सुरवात केली. पाणी मुरल्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आणि साठे कमालीचे वाढले. जमिनीची धूप थांबली आणि पावसाळ्यात येणारे पूर थांबले. वोनोगिरी जिल्ह्यातील अजून ३० पेक्षा जास्ती गाव पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करत असताना दाली मात्र पाण्याने भरून गेल. आजही सादिम्यान ने आपल कार्य सुरूच ठेवल आहे. इतर गावाने हि ह्याच अनुकरण केल.

एकेकाळी वेडा म्हणून हिणवला गेलेला सादिम्यान आज जगाच्या नकाशावर आपल्या कर्तुत्वाने हिरो ठरला आहे. त्याच साधेपण इतक कि त्याच्या शब्दात “I don’t want to be treated as a special person. All I want is to do everything in my power to make people having a better life.” पाण्याला जिरवणारा सादिम्यान कडून आपल्याला खूप काही शिकण्यासारख आहे. त्याच्या ह्या असामान्य कर्तुत्वास माझा सलाम.

– विनीत वर्तक