ऐसे कैसे झाले भोँदु …

जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांची जिल्ह्यातील आणि राष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा ‘साधासुधा माणूस’ अशी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या पायातल्या चपला किती साध्या, अंगावरचे कपडे कसे चुरगाळलेले किंवा तस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या सोबत भाजी आणि भाकरी काय खातात वगैरे साधेपणाकडं आणि त्यातही गरिबीकडं झुकणाऱ्या अनेक गोष्टी गेली अनेक वर्षे प्रसारमाध्यमांमधून चर्चिल्या जात आहेत. मनोहर पर्रीकरांबद्दल असंच ऐकायला मिळतं. यापुर्वी जॉर्ज फर्नांडिस यांच्या साध्या राहणीची चर्चा नेहमी व्हायची. संघ, कम्युनिस्ट, समाजवादी यांच्यातल्या शेकडो नेते-कार्यकर्त्यांच्या साध्या राहणीमानाचे खरे-खोटे किस्से खूप ठिकाणी, खुपदा चघळले जातात.

एखादा नेता कोणाच्या झोपडीत जाऊन जमिनीवर कसा बसला, एखाद्याच्या घरातली भाकरी हातात घेऊन त्यांनी कशी खाल्ली, कार्यकर्त्याच्या दुचाकीवरुन कसा फिरतो, उन्हातून चालतो का वगैरे दिखावू गोष्टींचं अतिरेकी अप्रूप आपल्यातल्या भोंदू मानसिकतेला साजेसं आहे. राजकीय नेत्याची वेषभूषा-राहणीमान किती साधं, याला एका मर्यादेपर्यंत जरुर महत्त्व आहे. पण हा त्याच्या राजकीय मूल्यमापनाचा दंडक ठरू शकत नाही.

पंडीत नेहरुंचे कपडे पॅरीसहून यायचे का किंवा नरेंद्र मोदींचा सूट दहा लाखांचा आहे का, नेता ‘एसी’ गाडीतून फिरतो की एसटीतून फिरतो यासारखी अनेक निरिक्षणे सरतेशेवटी फिजूलच असतात. नेत्याच्या गरीबीवर किंवा त्याच्या साधेपणावर भाळण्यापेक्षा मिळालेल्या सत्तेचा उपयोग त्यानं लोकांचं दैन्य-कष्ट-वेदना दूर करण्यासाठी किती प्रभावीपणानं केला, हे महत्त्वाचं. “तुम्ही साधे, सदा विवंचनाग्रस्त रहा आणि असेच गरीबीतच खपा; मीही साधेपणानं राहतो,’’ हा नाकर्तेपणा शून्य कामाचा आहे.

आक्षेप घेण्याच्या दोन गोष्टी जरुर असू शकतात. स्वतः साधं राहात असताना या नेत्याचे सगेसोयरे, पक्ष-संघटनेतली माणसं, लागेबांध्यातले लोक हे सगळे भरमसाठ मोठे होत गेलेत का? किंवा राजकारणात-सत्तेत आल्यानंतर मुळच्या आर्थिक परिस्थितीशी विसंगत असं उच्च राहणीमान त्या नेत्याचं झालंय का, श्रीमंतीचा-सत्तेचा दर्प वर्तणुकीला येतोय का? या दोन्ही शक्यता नसतील तर मुळातलाच साधा माणूस राजकारणात आल्यानंतरही तसाच साधा राहिला तर याचे फार गोडवे गाण्याची काडीमात्र गरज नाही. प्रामाणिकपणानं कमावलेलं उच्च राहणीमान, छानछोकीची जीवनशैली हा गुन्हा ठरु शकत नाही.

तर विषय जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा होता. जालन्यात भाजपची पर्यायाने दानवे यांची सत्ता सलग ४० वर्षं होती. यातली वीस वर्षं तर स्वतः रावसाहेब दानवे हेच सत्ताधारी आहेत. त्यांच्या साधेपणाचं कौतुक करुन झाल्यानंतर प्रदीर्घ काळच्या या खासदार त्यांच्या मतदार संघातील जनतेला काय दिलं, याची चर्चा प्राधान्यानं व्हायला हवी.

लोकांना गरिबीत ठेवणं, हेच दानवे यांचे एकमेव तत्त्वज्ञान आहे. लोकांची गरिबी टिकली तरच आपली सत्ता दीर्घकाळ टिकू शकते, यावरच त्यांचा विश्वास. गेल्या २० वर्षात जिल्ह्यात रस्ते, पाणी, वीज, तसेच विविध सरकारी योजना मधील भ्रष्टाचारानं तर यांच्याच कारकिर्दीत कळसच गाठला आहे, मात्र ते जिल्ह्यातील अडाणी लोकांना दिसत नाही. ते यावर पांघरून घालतात. अनेक ठिकाणी आता महामार्ग आणि जिल्हा मार्ग बांधले जात आहे. मात्र २० वर्षात याच रस्त्यासाठी किती खर्च झाला वगैरे तपशील नाही. पाहायला जावं तर अनेक रस्त्याची साधी पायवाट झाली आहे.

रावसाहेब दानवे यांच्या साधेपणाच्या रंगवून सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या भ्रामक आहेत. घराणेशाही, शेतकऱ्यांचे अपमान अनेक घोटाळे आणि गैरव्यवहारात (जे उजेडात येऊ दिले जात नाहीत) यांच्या जवळच्या लोकांचे आणि नातेवाईकांचे हात गुंतलेत. या माध्यमातून हातावर पोट असणाऱ्या गरीबांची पिळवणूक झाली. पण याची कधीही चौकशी झाली नाही. दानवे यांच्या काळात जी;जिल्ह्यात केवळ ३० टक्के रस्ते, 67 टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली (बीपीएल) गेली. साध्या राहणीचे दानवे ही प्रतिमा खोटी असून यांच्या कारकिर्दीत जालन्याची सर्व क्षेत्रात प्रचंड पीछेहाट झाली. त्यांनी जालन्याला गरिबी आणि गुन्हेगारीच्या खाईत लोटलं. येथील सर्व सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लिहिणारे पत्रकारच जन्माला आले नाहीत. कारण त्यांना चिरीमिरी देऊन गप्प केले जाते. मग इथं सर्व सामान्यांची काय गत आहे.

दानवे यांच्याविरोधात तर बोलूच नये, उलटी रिअँक्शन येईल, असंही काहींनी मला सांगितलं होतं. मात्र मी दीड वर्षांपासून काम सुरु केल्यावर जाणवलं की लोकांमध्ये नाराजी आहे. खासदाराच्याविरोधात रोष आहे. येथील लोकांमध्येही भाजपबद्दल अविश्वास आहे. याच रूपांतर येणाऱ्या काळात बदलाने होईल. अशी अपेक्षा आहे.

– संजय चव्हाण(पत्रकार )