अयोध्येला जाण्यावरून मनसेने उद्धव ठाकरेंना घेतले फैलावर

अयोध्येला जाण्यावरून मनसेने उद्धव ठाकरेंना घेतले फैलावर 38efdca45a90f9424e3a6e229bc59846

दसरा मेळाव्यामध्ये अयोध्येला जाण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कट्टर राजकीय विरोधक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरवरून खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अयोध्येला गेल्यामुळे महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?’, असा बोचणारा सवाल मनसेने या पोस्टर्सवरून विचारला आहे.

राम मंदिर उभारण्याचा विषय नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार विसरले आहे. गेल्या चार वर्षांत पंतप्रधान मोदी एकदाही अयोध्येला गेले नाहीत; पण मी 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहे. तिथून मी पंतप्रधान मोदी यांना जाब विचारणार आहे’, अशी घोषणा ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामधील भाषणात केली होती.

त्यावरून मनसेने पोस्टर्स प्रसिद्ध करून ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. या पोस्टरवर मनसेने ठाकरे यांना अयोध्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्याखालीच काही प्रश्‍नही उपस्थित केले आहेत.

मनसेने उद्धव ठाकरे यांना विचारलेले प्रश्‍न : 
1. महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?
2. महागाई कमी होणार का?
3. महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का?
4. बेरोजगारांना रोजगार मिळणार का?
5. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?
6. शेतीमालाला हमी भाव मिळणार का?
7. महाराष्ट्रातील दुष्काळ संपणार का?
8. मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?
9. महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का?
10. खिशातील राजीनामे बाहेर पडणार का?

‘राम मंदिर कधी बांधणार, हे कुणालाही माहीत नाही. मी अयोध्येला जाणार आणि तिथून मोदींना सांगणार आहे, की तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळू नका. एकदा सांगून टाका की तुम्ही मंदिर बांधता, की आम्ही मंदिर बांधू!’, असे विधान उद्धव ठाकरे यांनी त्या भाषणामध्ये केले होते.