बच्चू कडूंचं वऱ्हाड पालकमंत्र्यांच्या दारात

टीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमकपणे भूमिका घेणारे आमदार बच्चू कडू सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. तूर खरेदी केंदे्र तातडीने सुरू करून शेतकऱ्यांची तूर व हरभरा तातडीने खरेदी करा आणि चुकारे तसेच बोंडअळीचा मदतनिधी दिवसभरात द्या, यांसह इतर मागण्यासाठी आ. बच्चू कडू यांनी मंगळवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगरातील घरासमोर डेरा आंदोलन केले मात्र या आंदोलनापेक्षा ज्या प्रकारे ते आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले याची जास्त चर्चा आहे.

अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या घरासमोर बच्चू कडू हे आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन करणार होते याची माहिती पोलीस प्रशासनाला आगोदरच मिळाली होती. कडू आणि त्यांचे सहकारी पोटे यांच्या घरापर्यंत पोहचू नये म्हणून मोठा पोलीसबंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी कडू यांनी जी आयडिया वापरली त्याचा पोलिसांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.

पोटे यांच्या घरी वऱ्हाडमंडळी निघाले आहेत असं भासविण्यात आलं.‘पोटे परिवार’ असे खासगी वाहनावर लिहून, सोबत नवरदेवदेखील तयार ठेवून १० ते १२ ट्रॅव्हल्सने आंदोलक पोटे यांचे निवासस्थानी आले. येथेच पोलिसांची फसगत झाली. पालकमंत्र्यांकडचे पाहुणे समजून त्यांना प्रवेश देण्यात आला आणि मग ठरल्याप्रमाणे आंदोलन देखील झाले.

जिल्ह्यातील आॅनलाइन नोंदणी केलेल्या ३७ हजार शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे. ज्यांनी विकली, त्या शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून चुकारे नाहीत. बोंडअळीची मदत व पीक विमा भरपाईतून बँका कर्जकपात करीत असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत असल्याचे मुद्दे कडू यांनी यावेळी मांडले. जोवर मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर येथून हलणार नाही, असे जिल्हा प्रशासनाला ठणकावून सांगितल्याने प्रसासनासह पोलीस विभागाची गोची झाली. दरम्यान, पालकमंत्री व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आंदोलनस्थळी येऊन उपस्थितांची भेट घेवून मागण्या समजवून घेतल्या तसेच यासंदर्भात राज्याच्या अर्थमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.