करोडपती बनवणारा शेवगा, बाळासाहेब पाटील यांची यशोगाथा!

drumstick-farming

सोलापूर: घरासमोर किंवा शहरातही अगदी सहज दिसणारा शेवगा एखाद्याला लखपतीही बनवू शकतो. याच विषयावर सोलापूरच्या बाळासाहेब पाटील यांनी पुस्तक लिहिलं आहे. शेवग्याच्या लागवडीतून आलेले अनुभव यात त्यांनी लिहिलेत. केवळ शेवग्याच्या उत्पादनावर बाळासाहेब महिना एक लाखांचा नफा कमावत आहेत.

चार जणांचं कुटुंब, पारंपरिक शेती आणि कमालीची गरीबी. अशा परिस्थितीतून या कुटुंबाला शेवग्याच्या पिकानं बाहेर काढलं. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत ज्यांना होती, ते आता महिन्याला 1 लाखाची कमाई करत आहेत. इथेच न थांबता त्यांनी त्यावर पुस्तकही लिहीलं.

‘शेवगा बनवेल करोडपती’

हे किमयागार आहेत ‘शेवगा बनवेल करोडपती’ या पुस्तकाचे लेखक बाळासाहेब शिवाजी पाटील. सोलापूर जिल्ह्यातल्या उपळाई खुर्द गावात त्यांची 4 एकर शेती आहे. आता ही संपूर्ण शेती इतर शेतकऱ्यांसाठी शेवग्याचं विद्यापीठ बनलं आहे.

5 वर्षा 30 लाखांची कमाई

शेवग्याच्या पिकातून बाळासाहेबांनी 5 वर्षात 30 लाखांची कमाई केली आहे. या भरघोस यशाबद्दल त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. आपल्या घरावर हातात शेवगा घेतलेल्या शेतकऱ्याची प्रतिकृतीही त्यांनी उभारली आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी शेतात शेवग्याची नर्सरीही सुरु केली आहे. या नर्सरीमध्ये शेवग्याचं नवं वाणंही त्यांनी विकसीत केलंय.

पुस्तकाच्या लिखाणामध्ये बाळासाहेबांना त्यांचे भाऊ अरविंद पाटील यांची मोठी मदत झाली. शेतातील शेवग्याच्या नर्सरीचा संपूर्ण जबाबदारी ते सांभाळतात. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं या दोन्ही भावांनी शेवग्याचं पीक घेतलंय.

बाळासाहेबांनी लिहीलेलं पुस्तक इतर शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरतंय. या पुस्तकाच्या 3 हजार प्रतिंची आतापर्यंत विक्री झाली आहे. या पुस्तकात शेवग्याच्या लागवडीपासून त्यासाठी लगणाऱ्या खर्चाबाबत सगळी माहिती आहे. बाळासाहेबांच्या या पुस्तकामुळे अनेक शेतकरी शेवगा शेतीकडे वळत आहेत.

पाणी टंचाई असतानाही शेवग्याची कास

कोरडवाहू शेती आणि पाण्याची टंचाई, यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असायचे. पण बाळासाहेब पाटील यांनी मात्र चिंता न करता शेवग्याची कास धरली. अख्खं कुटुंब शेतात राबलं. गेली तीन वर्षे शेवग्याच पीक सातत्याने आलं. हलाखीची परिस्थिती सुबत्तेत परिवर्तीत झाली. ज्या शेवग्याच्या उत्पन्नातून घर, कुटुंब आणि शेती सुधारली त्या शेवग्याच्या पिकाबद्दल कुटुंबियांना कमालीची आत्मियता आहे.

कमी खर्चात, मात्र उत्तम नियोजनामुळे जास्त उत्पन्न

जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बाळासाहेबांनी शेवग्याची शेती केली. कमी खर्च, कमी पाणी आणि जादा उत्पन्न असं या शेवग्याच्या शेतीच रहस्य आहे. पाटील यांनी जिद्द, मेहनत आणी नियोजनाची जोड दिली. आता शेवग्याच्या रोपांची विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केलाय. त्याची यशस्वी शेती पाहून शेवग्याच त्याचं वाण घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वाढलीय. एकीकडे शेवग्याचं उत्पन्न आणि सोबत शेवग्याच्या बियांच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न असा दुहेरी फायदा बाळासाहेब घेतायत. भविष्यात शेवगा पिकावर आणखी संशोधन करून प्रगती करण्याचा मानस आहे.

शेवग्यामुळे संसाराला आधार!

तीन वर्षांपूर्वी पाटील कुटुंबियांना राहायला घर नव्हतं. कुडाच्या घरात त्याचं कुटुंब राहायचं. गावात त्यांची कसलीही आर्थिक पत नव्हती. शेवग्याच्या पिकाने साथ दिली आणि सुबत्ता आली. बाळासाहेब पाटील यांची सध्याची आर्थिक परिथिती चांगली असली तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत चिंता वाटतेय. त्यासाठीच ते आपला बराच वेळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात घालवतात. कोरडवाहू शेती आणि पाणी टंचाई असलेल्या शेतकऱ्यांना पिक पद्धतीत बदल करण्याचा अट्टाहास ते धरतात. आत्तापर्यंत त्यांनी हजारो शेतकऱ्यांना शेवगा शेती करण्याविषयी मार्गदर्शन केलंय. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या या बहाद्दर शेतकऱ्याला तोड नाही.

शेतात टुमदार घर,घरावर शेतकऱ्याचं शिल्प

शेवग्याच्या उत्पनांतून बाळासाहेब पाटील यांनी शेतात टुमदार घर बांधलं आहे आणि आपल्या घरावर बैलजोडीसह हातात शेवग्याच्या शेंगा असलेलं शिल्प उभारलं आहे. शेतकऱ्याच्या घरावर साकारलेलं आठ फुटांचं शिल्प पंचक्रोशीत कुतूहलाचा विषय बनला आहे.

30 हजार रुपये खर्चून फायबरचं शिल्प

माती आणि पीक याविषयी कायम कृतज्ञता रहावी, या भावनेने पाटील यांनी आपल्या घरावर बैलजोडी आणि हातात शेवगा घेतलेल्या बळीराजाच शिल्प उभारलं आहे. कारण शेवगा उत्पन्नातून बाळासाहेब पाटील यांच्या जीवनात अर्थक्रांती आली. 30 हजार रुपये खर्चून पाटील यांनी बळीराजाची ही फायबरची शिल्पकृती साकारली आहे.

5 एकरात शेवगा, 15 लाखांचं उत्पन्न

पाटील यांची एकूण बारा एकर शेती आहे. त्यापैकी पाच एकरात ते शेवगा घेतात. एकरी 15 टन प्रमाण त्यांना वार्षिक 15 लाखांचं उत्पन्न मिळालं. गेल्या तीन वर्षात सातत्याने शेवग्याच्या उत्पन्नातून पाटील यांची आर्थिक स्थिती सुधारली. शेवग्याच्या विक्रीतून आलेल्या पैशातून शेतात टुमदार घर बांधलं आहे. ही सगळी किमया शेवग्याने केली आहे. म्हणून पाटील यांनी शेवग्याच्या शेंगा हातात घेतलेल्या बळीराजाच शिल्प घरावर उभ केलं आहे.

Add Comment

Click here to post a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.