धर्मा पाटील यांच्या शेतीच्या पुनर्मुल्यांकनाचे आदेश दिले- बावनकुळे

नागपूर – मोबदल्यासाठी आपला जीव गमावणारे धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर अखेर ऊर्जा विभागाने येत्या 30 दिवसात त्यांच्या शेतीचे पुनर्मुल्यांकन करून मोबदला देण्याचे आदेश दिलेत. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, सोमवारी नागपुरात तडकाफडकी पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन औष्णिक वीज प्रकल्पामध्ये गेली. त्यांनी या जमिनीसाठी 4 लाख रुपये मोबदला देण्यात आला. परंतु, त्यांच्या शेतातील आंब्या झाडांचे मूल्यमापन किंवा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतीला अधिक मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच विष प्राशन केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे 28 जानेवारी रोजी मुंबईत निधन झाले. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर तत्काळ त्यांच्या कुटुंबियांना वाढीव मोबदला देण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात. याबाबत आज, सोमवारी 29 जानेवारी रोजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात तत्काळ पत्रपरिषद बोलावून पाटील यांच्या शेतीचे येत्या 30 दिवसात पुनर्मुल्यांकन करून वाढीव मोबदला दिला जाईल अशी माहिती दिली.

शेतामधील फळझाडांचे मूल्यांकन व शेतीच्या क्षेत्रफळानुसार मोबदला देण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांना अधिक मोबदला दिला व काहींना कमी मोबदला दिल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर 10 लाख रुपये मोबदला देण्याच्या संदर्भात विचार सुरू आहे. येत्या 30 दिवसात या प्रकरणाचा निकाल लावून व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.