गुजरात मधील सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला असा होणार फायदा

वेब टीम:- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतेच देशातील सर्वात मोठ्या व जगातील दुसऱ्यां क्रमांकावर असलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करण्यात आले. या धरणापासुन अनेक राज्यांना फायदे होणार आहेत. धरणाच्या पाण्यापासून तयार करण्यात येणाऱ्या वीज निर्मितीपैकी २७% वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. कदाचित या प्रकल्पामुळे तरी महाराष्ट्रातील अजूनही आंधारात असलेली गावे आता उजेडात येतील. या धरणावरील दोन वीज प्रकल्पांमधून आजवर 4,141 कोटी युनिट विजेची निर्मिती करण्यात आली आहे. नर्मदा नदीच्या पात्रात बनवण्यात आलेल्या एका वीज प्रकल्पाची 1,200 मेगावॅट तर कालव्यावर तयार करण्यात आलेल्या वीज प्रकल्पाची 250 मेगावॅट इतकी वीजनिर्मिती क्षमता आहे. त्यामुळे यातील २७% वीज महाराष्ट्राला वर्ग होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे राज्यातील अनेक वीज निर्मिती केंद्र उन्हाळ्यात बंदच ठेवावी लागतात त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खेडेगावत तर परिस्तिथी अजूनच बिकट आहे त्यामुळे सरदार1सरोवर प्रकल्प महाराष्ट्रासाठी वरदान ठरेल.

सरदार सराेवर धरणाची वैशिष्ट्ये:

१) अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सरदार सरोवर धरण हे जगातील सर्वात मोठे धरण आहे.

२) नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाचा प्रस्ताव सर्वप्रथम भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी मांडला होता. त्यानंतर ५ एप्रिल १९६१ रोजी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते.

३) धरणाची उंची १३८.६८ मीटर तर लांबी १ हजार १२० मीटर इतकी आहे. सरदार धरणाला एकूण ३० दरवाजे आहेत.

४) या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ४.७३ मिलियन क्युसेक इतकी आहे

५) धरणावर गुलाबी, पांढऱ्या आणि लाल रंगाचे ६२० एलईडी बल्ब लावण्यात आले आहेत. त्यापैकी १२० बल्ब धरणाच्या ३० दरवाज्यांवर लावण्यात आले आहेत.

६) हे धरण बांधण्यासाठी ८६.२० लाख क्युबीक मीटर सिमेंटचा वापर केला गेला आहे. इतक्या सिमेंटपासून पृथ्वी ते चंद्रापर्यंत रस्ता तयार होऊ शकतो.

७) केंद्रात सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने २०१४ मध्ये पहिल्यांदा २० दिवसात या धरणाची उंची १२१.९२ मीटरवरून १३८.७२ मीटर इतकी करण्यास परवानगी दिली होती. ही उंची वाढवण्यासाठी डिसेंबर २०१७ ची मुदत देण्यात आली होती.

८) नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणाला १९८० पासून विरोध सुरु झाला. त्यानंतर १९८५ पासून सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र झाले. पाटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज देखील सुरु आहे. या धरणामुळे जे लोक विस्थापित होणार आहेत त्यांच्यासाठी मेघा पाटकर यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.

९) एका अहवालानुसार या धरणामुळे ५ लाखांहून अधिक कुटुंब विस्थापित झाली आहेत.

१०) सरदार धरणाचा सर्वाधिक फायदा गुजरात राज्याला होणार आहे. या धरणामुळे गुजरातमधील १५ जिल्ह्यातील ३ हजार १३७ गावातील १८.४५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

११) धरणातून तयार करण्यात येणाऱ्या वीज निर्मितीतील सर्वाधिक म्हणजे ५७ टक्के वाटा मध्य प्रदेशला मिळणार आहे. तर महाराष्ट्राला २७ टक्के आणि गुजरातला १६ टक्के इतका वाटा मिळणार आहे. तर राजस्थानला केवळ पाणी दिले जाणार आहे.

१२) या प्रकल्पामुळे १८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.