शेतकरी संघटनांच्या बैठकीत मोठा निर्णय; कृषी कायद्यांच्या विरोधात ३ नोव्हेंबरला देशव्यापी ‘चक्का जाम’

केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधीत मंजूर केलेल्या कायद्यांना पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणत आंदोलने करत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांची कुरूक्षेत्र येथे बैठक पूर्ण झाली. या बैठकीत ३ नोव्हेंबरला देशव्यापी ‘चक्का जाम’ करुन कृषी कायद्यांचा विरोध करण्यात येणार असल्याची भूमिका या संघटनांनी घेतली आहे.

हरियाणा भारतीय किसान संघटनेने कुरुक्षेत्र येथे विविध शेतकरी संघटनांची बैठक बोलावलेली होती. यामध्ये या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करण्याची भूमिका या संघटनांनी घेतली आहे. या बैठकीला हरियाणा, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या विविध राज्यातील शेतकरी नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी भारतीय किसान युनियनचे (बीकेयु) प्रमुख गुरनाम सिंग म्हणाले की, सरकारने केलेल्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधासाठी आणि पुढील रणणिती ठरवण्यासाठी विविध शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली. येणाऱ्या काळात या कायद्यांना आम्ही कडाडून विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीच्या निकषांचा भंग –भाजप सरकारने लोकशाहीच्या निकषांचा भंग केला असल्याचा आरोप गुरनाम सिंग यांनी केला आहे. भाजपने घाईगडबडीत ही विधेयके मंजूर करुन घेतली आहे. ही विधेयके मंजूर करताना कोण्यात्याही राज्यांशी चर्चा केली नाही. तसेच सभागृहात चर्चेविनाच ही विधेयके मंजूर करुन घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता.

सत्ता भाजपच्या डोक्यात गेली –कृषी कायद्यांच्या विरोधात विविध शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, सरकारने अद्याप त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. या सरकारने कोणत्याही आंदोलनाची दखल घेतली नाही. यावरुन सत्ता भाजपच्या डोक्यात गेली असल्याचे गुरनाम सिंग म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचे ऐकून घेण्यास सरकार नकार देत असल्याने त्यांचा निषेध करत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांवर सत्ता गाजवणाऱ्या भाजप सरकारला ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढा द्यायला हवी असे वक्तव्य किसान महापंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राम पाल जाट यांनी केले. या कायद्यांविरोधात लढण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन समान कार्यक्रम ठरवण्याची वेळ आली असल्याचे राम पाल जाट म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –