सातारा – महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं समोर येत होतं. तर, संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा काही निर्बंध लावत सूट दिलेल्या सर्व जिल्ह्यांचा तिसऱ्या स्तरात समावेश केला.
तर, पश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या ही अधिकच असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी चौथ्या स्थरातून सातारा जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात करण्यात आला होता. यामुळे अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांना देखील मर्यादित वेळेत परवानगी देण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आता लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध लावण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद राहणार आहोत. अत्यावश्यक दुकानांसह सेतू, आधार केंद्रे व सीएंची कार्यालये, शैक्षणिक साहित्याची दुकाने (केवळ घरपोच सुविधेसाठी) सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहणार आहेत. शेतीशी संबंधित सर्व दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. आजपासून पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू राहतील.
काय आहेत नवे नियम –
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यास सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत परवानगी असेल.
- हॉटेल्स, रेस्टारंटस् ही केवळ घरपोच सुविधेसाठी सकाळी नऊ ते रात्री आठपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
- लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद असेल. मात्र, हॉटेलमध्ये बसण्यास बंदी असणार आहे.
- सार्वजनिक जागा, खुली मैदाने, क्रीडा विषयक बाबी, चालणे व सायकलींगसाठी सकाळी पाच ते नऊ यावेळेत परवानगी दिली आहे. मात्र, शनिवार, रविवारी मनाई असणार आहे.
- आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरणास परवानगी असेल.
- तसेच लग्न समारंभास दोन तासाच्या मर्यादेत २५ लोकांच्या उपस्थितीत परवानगी असेल. त्यासाठी तहसिलदारांची परवानगी आवश्यक असेल.
- २० नातेवाईकांच्या उपस्थितीत दशक्रिया व अंत्यविधीस परवानगी असेल.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, बैठका, सभांना ५० टक्क्यांच्या उपस्थितीत परवानगी असणार आहे.
- मजूरांची राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच बांधकामांना परवानगी असणार आहे.
- शेतीशी संबंधित सर्व दुकाने दुपारी आठवड्याचे सर्व दिवस सुरू ठेवता येणार आहेत.
- केश कर्तनालय व सौंदर्य केंद्रे लस घेतलेल्या नागरीकांसाठीच दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
- सार्वजनिक परिवहन सेवा ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहणार आहे.
- गॅरेज, स्पेअर पार्ट व पंक्चरची दुकाने केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी चालु ठेवता येणार आहेत.
- कोरोनाच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यातून येण्यासाठी पासची आवश्यकता आहे.
अत्यावश्यक या गोष्टी राहणार सुरु –
- किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी
- मटण, चिकन, अंडी, मासे दुकाने
- रिक्षा, टॅक्सी, अत्यावश्यक सेवेसाठी
- खासगी, सहकारी बँका
- सर्व बाजार समित्या सकाळी सात ते दोन
- खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी
- खासगी बसेसने आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (50 टक्के प्रवाशी)
- पेट्रोल पंप अत्यावश्यक वाहनांसाठी 24 तास सुरू
- व्हेटरीनरी हॉस्पिटल, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स
- दूध संकलन केंद्रे सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सहा ते आठ घरपोच सुविधा
- कृषी विषयक दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत
- शिवभोजन थाळी केवळ पार्सल सुविधा
- शीतगृहे व गोदाम सेवा
- स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा
- भारतीय सुरक्षा मंडळ कार्यालये
- टेलिकॉम सेवेतील दुरस्ती व देखभाल
- ई-व्यापार
लॉकडाउन कडक राहणार असले तरी वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी राहणार आहे. मात्र, त्याचे वितरण केवळ घरपोच करत येणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या –