मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यामध्ये तीन दिवस कडक ‘लॉकडाऊन’!

बंद

बीड – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची संख्या दिवसाला हजाराचा आकडा पार करत आहे. यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. गंभीर परिस्थिती असली तरी देखील येथील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करत येथे सर्रास लोकं बाहेर फिरत आहेत. अखेर जिल्ह्जाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात तीन दिवसाचं लॉकडाऊन जाहीर केलं आहे.

जिल्ह्यात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असा तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान किराणा दुकाने, भाजी मंडईसह सर्वच प्रकारच्या आस्थापना कडक बंद राहणार आहेत. केवळ वैद्यकीय अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तीन दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाभरातील बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरू राहणार आहेत.

राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिलेले आहेत. मात्र, नागरिकांकडून योग्य नियमांचे पालन होत नसल्याने व यंत्रणेकडून थेट कारवाई होत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची पोलीस आणि आरोग्य यंत्रणेकडून अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लागू केलेल्या आदेशाची अंमलबजावणीही जिल्हाभरात केलेली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची भर पडतच आहे. त्यामुळे अखेर जिल्हाधिकारी जगताप यांनी मंगळवारी (दि. ४) रात्री १२ वाजेच्या सुमारास बुधवार, दि. ५ मेपासून तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला.

सर्व औषधालये, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल, फार्मास्युटिकल कंपन्यांसह इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात सहायक उत्पादन आणि वितरण युनिट, त्यांचे डीलर्स, वाहतूक आणि पुरवठा साखळी, लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि साहाय्य सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. तसेच जिल्ह्यात दूध विक्री केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहील. तर गॅस सिलिंडर वितरण दिवसभर सुरू राहील. दूध व गॅस सिलिंडर यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. कारण दोन्ही सेवा घरपोच असतील.

महत्वाच्या बातम्या –