शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी भाजपचा कोल्हापुरात मोर्चा

भाजपचा कोल्हापुरात मोर्चा

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, आणि  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह मायक्रो फायनान्सच्या कर्जमाफी या मागणीसाठी भाजपच्यावतीने मंगळवारी (ता.२८) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

भाजप सरकारने केलेल्या कर्जमाफी योजनेतील निकष बदलत शेतकऱ्यांसाठी नवी कर्जमाफी योजना आणली. पण, या योजनेतून कोणताच शेतकरी समाधानी झाला नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी झाली आहे. सरकारने भाजप सरकारचे नियम मोडून नवे नियम केले आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली, हे येथून पुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे भाजप नेत्यांनी या वेळी स्पष्ट केले.

तसेच घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा सरकारमधील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली होती. त्यामुळे राज्य सरकारला या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी मोर्चा काढला आहे. दोन लाखापेक्षा जास्त असलेले आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे.

पश्चिम महाराष्ट्रात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी संख्या जास्त असून त्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. महापूर, अतिवृष्टी, पूर पट्ट्यातील शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यांना सरकारने न्याय द्यावा. सहकारी संस्थांतील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एकत्रित दरमहा पगार २५ हजारपेक्षा जास्त आहे, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ झाला पाहिजे.

तसेच येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही तर त्याची ठिणगी कोल्हापुरातून पडेल. प्रसंगी आम्ही मंत्रालयासमोर जाऊन आंदोलन करू, असा इशाराही या वेळी उपस्थित भाजप नेत्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या –

पीक विमा योजनासाठी उपसमिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

प्रक्रिया उद्योगामुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल – नवाब मलीक

तुरीची खरेदी कमी दरात करून हमीभावाने विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक

कोणत्याही लिंकवर क्लिक करताना विचार करा, अन्यथा तुमचं खातं होणार रिकामं