बोंडअळीच्या नुकसानीसाठीचा ५१ लाखांचा पहिला हप्ता आला

अहमदनगर / प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला १२५ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी ५१ लाख रुपयांचा पहिला टप्प्यातील निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. हा निधी वितरित झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील निधी जिल्ह्याला प्राप्त होणार आहे.

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या कापसाच्या पिकाचे नुकसान भरपाईपोटी काही प्रमाणात का होईना निधी मिळाल्याने या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यभरात कापूस व धान्य पिकांवर किडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईच्या पोटी राज्यभरात एकूण ३ हजार ४८४ कोटी ६१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबत आदेश काढला होता. त्यानुसार नगर जिल्ह्यालाही नुकसान भरपाई मिळणार आहे. नगर जिल्ह्याला मिळणाऱ्या १२५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईपैकी पहिल्या टप्प्यातील रक्कम सध्या जिल्ह्याला वर्ग झाली आहे. तालुकानिहाय तिचे वितरण केले जाईल. नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारीबरोबर नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड होते. जिल्ह्याच्या दक्षिणेतील शेवगाव, नेवासे, पाथर्डी तालुक्यांमध्ये, तर कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

यंदा या तीन तालुक्यांत जवळपास १ लाख ६ हजार हेक्टरवर कपाशी लावलेली होती. मात्र, बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा तिन्ही तालुक्यांतील कपाशीच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे मदतीची मागणी केल्यानंतर सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे केले. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे १ लाख ९७ हजार ३४२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले होते.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे बाधित जिरायत व बागायत क्षेत्रासाठी १५७ कोटी २३ लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचेही म्हटले होते. प्रत्यक्षात जिल्ह्याला नुकसान भरपाईपोटी १२५ कोटी ५९ लाखांचा निधी मिळाल्याचे आदेशात नमूद आहे. आता उरलेल्या निधीसाठी जिल्हा प्रशासनाला व शेतकऱ्यांना रेटा लावावा लागणार आहे. उर्वरित निधीचे काय? बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी नगर जिल्ह्याला सुमारे १२५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

त्यातील पहिल्या टप्प्यातील ५१ लाख रुपयांचा निधी अलीकडेच जिल्ह्याला प्राप्त झाला. उर्वरित निधी दोन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. सुरुवातीचा ५१ लाख रुपयांचा निधी तालुकानिहाय, गावनिहाय वितरित करून त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर याच प्रकारे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील भरपाईचे वितरण केले जाईल.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात कापसाच्या पिकाचे नुकसान झाले होते. याबाबत राज्यभरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची याचना केली होती. त्यासाठी आंदोलने करण्यात आली. निवेदने देण्यात आली. राज्यभरातून रेटा वाढल्याने अखेर शासनाने बोंडअळीमुळे झालेल्या कापसाच्या पिकाच्या नुकसान भरपाईपोटी काही रक्कम देण्याचा आदेश काढला. त्यानुसार जिल्ह्याला सुमारे १२५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.