यावर्षी जर अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

टीम महाराष्ट्र देशा- कोट्यावधी रुपये शासन हवामान खात्यावर खर्च करते मात्र बऱ्याचदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत नाही. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजाच्या चुकल्याने हवामान खात्याच्या भरवश्यावर असलेल्या शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा अडचणींचा सामना करावा लागतो.

गेल्यावर्षी हवामान खात्याचा अंदाज खरा न ठरल्याने हजारो कोटी रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी जर अंदाज चुकला तर हवामान खात्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते गंगांभीषण थावरे यांनी दिला आहे.

राज्यातील हवामान विभागावर आता आमचा विश्वास राहिला नाही. त्यांनी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला तर पाऊस पडतच नाही उलट ऊन पडते. हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, हजारो कोटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला असल्याचे थावरे यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपये खर्च या खात्यावर होतो तरीही खात्याची विश्वार्हताच राहिली नाही. जर यंदा ही हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला तर १५ ऑगस्ट रोजी हवामान खात्याच्या कार्यालयाला कुलूप ठोकू असा थेट इशारा थावरे यांनी दिला आहे.