बीटी कापसाच्या मान्यतेबाबत पुनर्विचार व्हावा ; सदाभाऊ खोत यांचे केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र

मुंबई : “बीटी कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून, शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राने केलेल्या सर्वेक्षणामध्ये नोंदविले आहे. त्यामुळे बीटी कापसाच्या बी. जी.-२ बियाण्यांना वाणिज्यिक मान्यता देण्याबाबत पुनर्विचार करावा,” असे निवेदन कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना पाठविले आहे.

कापूस लागवडीसाठी बहुतांश शेतकरी बीटी कापसाची लागवड करतात. केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने बी.जी.-२ तंत्रज्ञानावर आधारित बियाणे उत्पादनाची परवानगी बियाणे उत्पादकांना दिली आहे. परंतु सद्यःस्थितीत बीटी कापसाचे वाण शेंदरी बोंड अळीला बळी पडत असून, शेंदरी बोंड अळीच्या विरोधातील प्रतिकारक्षमता कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.