शेतक-यांकडून उडीद, मूग, सोयाबीन तात्काळ खरेदी करा – सुभाष देशमुख

मुंबई : राज्यात हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केली आहेत. ज्या शेतक-यांनी खरेदीसाठी खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्या शेतक-यांना एस.एम.एस., दूरध्वनी करून खरेदी केंद्रांवर येण्याची तात्काळ माहिती देवून त्यांचे धान्य खरेदी करण्याचे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले. किमान आधारभूत किंमतीनुसार सुरू करण्यात आलेल्या मूग, उडीद, सोयाबीन, कापूस खरेदी केंद्रांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री.देशमुख यांनी सांगितले.

श्री.देशमुख यांनी, राज्यात सुरू असलेले सर्व खरेदी केंद्रांची संख्या, खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतक-यांची संख्या, खरेदीचे प्रमाण, शेतक-यांच्या अडचणी याबाबत आढावा घेतला. राज्यातील काही शासकीय खरेदी केंद्रावर शेतक-यांनी नोंदणी केलेली आहे, मात्र शेतक-यांना अद्यापही एस.एम.एम.व्दारे माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

नोंदणी केलेल्या शेतक-यांना तात्काळ माहिती देण्यात यावी. ज्या खरेदी केंद्रांवर खरेदीचे प्रमाण कमी असून शेतक-यांना माहिती दिली जात नाही किंवा धान्य खरेदी होत नाही त्यांच्यावर कारवाई करावी,ज्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात मागणी आहे त्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करावेत, असे निर्देश श्री.देशमुख यांनी दिले. मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पणन विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, नाफेडचे अधिकारी उपस्थित होते. नमस्कार, मी पणन मंत्री सुभाष देशमुख बोलतोय.. तुमच्या काय अडचणी आहेत ? नमस्कार, मी पणन मंत्री सुभाष देशमुख बोलतोय, खरेदी केंद्राबाबत तुमच्या काय अडचणी आहेत?अशा संवादाने मंत्री श्री.देशमुख यांनी दूरध्वनीद्वारे थेट शेतक-यांशी संवाद साधला.

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया कशा प्रकारे सुरू आहे, ऑनलाईन प्रणालीचा फायदा होतो आहे की नाही ?, एस.एम.एस. प्रणाली याबाबत शेतकरी अनिल गोरखनाथ विसावे, जि.अकोला व गौतम मडके जि.अहमदनगर त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे मंत्री श्री. देशमुख यांनी संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या.