साखर दर उपाययोजनेसाठी केंद्र सरकार सकारात्मक; सुरेश प्रभू यांचे आश्वासन

मुंबई / नवी दिल्ली : साखरेला योग्य दर मिळण्याबरोबरच ते स्थिर राखण्यासाठी साखरेच्या निर्यातीला मंजुरी देण्यासह निर्यात अनुदान देण्याची मागणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन आज केली. या मागणीचा केंद्र सरकार सकारात्मकपणे विचार करेल, असे आश्वासन श्री. प्रभू यांनी यावेळी दिले.

खोत यांनी उद्योगमंत्र्यांना माहिती दिली, सद्यस्थितीत खुल्या बाजारात साखरेच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दर 2 हजार 800 रुपयांच्या दरम्यान आहेत. साखर कारखान्यांचा उत्पादन खर्चही यातून निघत नाही. यामुळे साखर उद्योगाला मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साखर उद्योग आणि साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तात्काळ उपाय योजना करण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2017-2018 मध्ये 251 लाख मे. टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आज देशात 253 लाख मे. टन साखरेचा साठा शिल्लक आहे. हंगामाच्या शेवटी 40 लाख टन शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.

साखरेच्या अनुषंगाने विविध उपाय योजना करण्याची मागणी श्री. खोत यांनी यावेळी केली. त्याअंतर्गत खुल्या बाजारात साखरेचे भाव स्थीर करण्यासाठी 20 लाख टन साखर निर्यात करणे,रिफाईन्ड (पक्क्या) साखरेसाठी 500 रुपये प्रती क्विंटल आणि कच्च्या साखरेसाठी रू. 1 हजार रुपये प्रती क्विंटल निर्यात अनुदान द्यावे, आयातीवर 100 टक्के आयात शुल्क लावावे. निर्यातीवर लावण्यात आलेले शुल्क रद्द करावे. साखरेच्या 50 लाख मे. टन बफर स्टॉकच्या देखभालीचा खर्च आणि तारणावरील व्याज केंद्र सरकार कडून देण्यात यावे. मळीवरील वाहतूक कर रद्द करण्यात यावा.2017-18 साठी साखर उद्योगाला केंद्र सरकारची उत्पादन अनुदान योजना लागू करावी. साखरेवरील रिव्हर्स स्टॉकला मर्यादा लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत.