महायोजना शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना निश्चितच होणार फायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबीर 2019 चे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार प्रा. मेधाताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागामध्ये योजनांची शिबिरे आयोजित केली जातात.  शहरी भागांमध्ये अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य नागरिकांना लाभ देण्यासाठी मेधाताईंनी कोथरूड भागामध्ये या शिबिराचे आयोजन केले आणि या शिबिराला एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय, ही आनंदाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,प्रत्येकाला आवश्यक असलेल्या योजनांचा स्टॉल याठिकाणी आहे. समाजातील सर्व घटकांकरिता योजना आहेत. सर्व स्टॉलवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, यावरूनच लोकांना या शिबिराची आवश्यकता होती, मात्र व्यवस्था नव्हती. आज या शिबिरामुळे ती व्यवस्था उभी राहिली आहे. लाखो लोकांचे कल्याण त्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे शासनाचे नियोजन आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाच्या घरात गॅस पोहोचला, तर आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळाल्या आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. प्रकल्प मार्गी लावून त्या प्रकल्पाला निधी देण्याचे काम शासनाने केले आहे. येत्या तीन ते चार वर्षात पुणे शहर सर्वोत्तम शहर असेल. पुण्याचा बदललेला चेहरा येत्या काळात नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

महायोजना शिबिराच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांनी योजनांसाठी अर्ज केला असेल त्यासाठी आलेल्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आपल्या बरोबर राहिल,असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना आ. मेधाताई कुलकर्णी म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. महायोजना शिबिराच्या माध्यमातून विविध योजना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न असून या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

महायोजना स्थळी नवीन मतदार नाव नोंदणी,  प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, शैक्षणिक व शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, राजश्री शाहू शिष्यवृत्ती योजना,  नोकरदार महिला वस्तीगृह योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना आदी योजनाबाबत माहिती व लाभासाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने महिला बाल कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना, युवा कल्याणकारी योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना या योजनांसंदर्भात सविस्तर माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. योजनांची माहिती व लाभाची नोंदणी प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायोजना शिबिरातील स्टॉलची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यातील शांततापूर्ण वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीत वाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस