राज्यातील शेतकऱ्यांना चार वर्षांत ५० हजार कोटी रुपयांची मदत केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

औरंगाबाद : सध्याचे सरकार हे गतिमान सरकार असून सामान्यांच्या,शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या सरकारने गेल्या चार वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. तसेच यावर्षीही दुष्काळाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला असून त्या निधीतूनही शेतकऱ्यांना पीक विमा आणि थेट स्वरुपात आर्थिक मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औरंगाबादमध्ये सांगितले.

फुलंब्री येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय इमारत फुलंब्री, फुलंब्री-कान्होरी-बाबरा-नाचनवेल रस्ता व पुलांची कामे इत्यादी 10 विकास कामांच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,खासदार रावसाहेब दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड.देवयानी डोणगावकर,फुलंब्री नगर पंचायतचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सामान्य माणसांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याच्या भूमिकेतून शासन विविध कल्याणकारी योजना यशस्वीरित्या राज्यभरात राबवित आहे. गतिमान सरकार म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील जनतेला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यास शासनाकडून प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज फुलंब्री तालुक्यात सर्व महत्त्वाच्या कार्यालयांची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून सोय झाली आहे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. लोकांना सेवा देणे हे सरकारचे प्रथम काम असते हे लक्षात घेऊन या सरकारने लोकसेवा हक्क अधिनियम आणला आहे.

त्याअंतर्गत सहा कोटी लोकांनी केलेल्या अर्जापैकी 98 टक्के लोकांना आपण तत्परतेने वेळेत सेवा पुरवल्या आहेत. प्रशासकीय इमारतीची उपयुक्तता ही इमारतीच्या बाह्य रुपावरुन ठरत नसते तर त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना किती प्रभावीरीत्या योग्य वेळेत सेवा उपलब्ध करुन दिल्या जातात यावरुन त्या कार्यालयाच्या इमारतीची उपयुक्तता ठरते. या दृष्टीने आमचे सरकार गतिमानतेने आपल्या विविध योजनांद्वारा जनसामान्यांना न्याय्य हक्क, सुविधा उपलब्ध करुन देत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.